नांदेड l एसएफआय विद्यार्थी संघटनेचे १९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नुकतेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे पार पडले. या अधिवेशनात एसएफआय विद्यार्थी संघटनेची नवीन कार्यकारणी करण्यात आली.यात नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आणि विद्यार्थी चळवळीतील एक परिचित चेहरा, विजय लेहबंदे यांची स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नांदेडसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी चळवळीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


विजय लोहबंदे यांनी आजवर विद्यार्थी हितासाठी अनेक आंदोलने आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची तळमळ, संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सखोल जाण यामुळे ते विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने, विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसएफआय ही देशातील एक प्रमुख आणि जुनी विद्यार्थी संघटना असून, ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत आली आहे. लेहबंदे यांच्या निवडीमुळे संघटनेला एक नवीन ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
