हिमायतनगर। हिमायतनगर येथे माता वासवी जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात, मंगलमय वातावरणात येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील जेष्ठांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.


प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी माता वासवी जन्मोत्सव निमित्ताने सकाळी 11.30 वाजता कुंकुम अर्चना करण्यात आले, त्या प्रसंगी साधारणतः 40 महिलांनी आपला सहभाग नोंदवला. कुंकुम अर्चना, आरती नंतर महिलांसाठी अल्पोपहार ठेवण्यात आला होता.

सायंकाळी प्रगत कार्यक्रमात भव्य अशा व्यासपीठावर माता वासवी कन्यका परमेश्वरी ची भव्य अशी प्रतिमा स्थापित करून पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रविसेठ बंडेवार होते. प्रमुख पाहुणे प्रभाकरराव पत्तेवार, संतोषजी पिंपरवार, डॉ. पालिकोंडावर, मा. सुनीलजी व्यवहारे, गजानन तुप्तेवार, पोलिस निरीक्षक अमोल भगत आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

प्रवीण कुमार जन्नावार यांनी प्रस्ताविक केले त्यात त्यांनी थोडक्यात माता वासवी चा इतिहास सांगून आजच्या परिस्थितीत समाज म्हणून आपण एकत्र येणे कसे गरजेचे आहे, धर्मरक्षणासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे हे उदाहरणासह विषद केले. प्रभाकरराव पत्तेवार यांनी आपल्या ओघवत्या वाणीने समाजास प्रबोधन केले. गजानन तुप्तेवार यांनी महासभेकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात समाजातील सर्व ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर आणि सर्व समाज बांधवांना माता वासवी कन्यका परमेश्वरीची सुंदर अशी प्रतिमा भेट देण्यात आली. आभार प्रदर्शन समाजाचे अध्यक्ष तथा शासकीय गुत्तेदार सुरेशजी पळशीकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. मनोज जन्नावार यांनी केले. वासवी मातेची आरती सुरेश पळशीकर, सौ. जया पळशीकर, किशोर रायेवार, सौ मयुरी रायेवार, श्याम मारुडवार, सौ. सरोज मारूडवार, आणि प्रवीण जन्नावार, सौ. जया जन्नावार आदींनी केली. या कार्यक्रमास आमदार बाबुरावजी कदम कोहलीकर यांनी भेट देऊन सर्व समाज बांधवांशी हितगुज करत वासवी माता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
आरती नंतर सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सुंदर अशा रथावर माता कन्यका परमेश्वरीची प्रतिमा आरूढ होती. शोभायात्रा ढोलताशाच्या गजरात परमेश्वर मंदिर ते शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. शोभायात्रेनंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.