उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीतील येळी ता.लोहा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास बरबडा ता.नायगाव येथील एका अविवाहित तरुणाने नदीपात्रात उडी घेत आपली जीवन यात्रा संपविली. यावेळी त्याने आत्महत्या पूर्वी आपल्या आई आणि वडील या दोघांचाही मोबाईल नंबर चिट्टीत लिहून त्यांना कळवा, असे नमूद केले पुलावर ही चिट्टी व घड्याळ पोलिसांना आढळून आली आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही.
सिताराम साईनाथ शेट्टे (वय २४ वर्ष) असे त्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान २३ डिसेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर मृतदेह पोलीसांनी शोधून काढला. नदीमध्ये पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आत्महत्या केलेला तरुण हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. बरबडा ता. नायगाव येथील सिताराम साईनाथ शेट्टे (वय २४ वर्ष) हा इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेतलेला तरुण नांदेड शहरातील एका टेन्ट सप्लायर्सच्या दुकानावर मजुरीने काम करत होता.
दि.२२ डिसेंबर शनिवारी रात्री तो नांदेड शहरातून आपले काम करून कापशी बुद्रुक ता. लोहा येथील त्याचा मामा अशोक यनकफळे यांच्या घरी आजोळी रात्री मुक्कामाला आला. रात्री जेवण करून झोपला व दि. २३ डिसेंबर सोमवारी सकाळी जेवण करून मी गावाकडे जातो म्हणून निघाला व थेट त्यांनी गोदावरी नदीपात्रावरील येळी- महाटी पुलावर हाताची घड्याळ, ‘ चप्पल काढून एका चिठ्ठीत त्याने त्याची आई व बाबा या दोघांचाही मोबाईल नंबर लिहिला.
ही माहिती या नंबरवर त्यांना कळवा, असे नमूद करून पुलावरून उडी घेतली. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार अशोक हंबर्डे, शिंदे, माधव पवार, पोलीस पाटील आनंद लांडगे व गावकऱ्यांच्या सहकार्याने शोधमोहीम यशस्वी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती दिली. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.