नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत नुकतेच नाट्यसंहिता व ललित साहित्याचे अभिवाचन या वाचन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी होते. तर डॉ. नीना गोगटे, डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर व प्रा. राहुल गायकवाड यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमात कृष्ण चंदर लिखीत व भारत सासणे अनुवादीत ‘उघडा, दरवाजे उघडा’ या मुळ उर्दु नाटकाच्या संहितेचे वाचन केले. यावेळी वाचणारे विद्यार्थी व ऐकणारे रसिक दोघेही नाट्यवाचनात रंगून गेले होते. नाटकातील मिश्कील प्रसंगाच्या वाचनादरम्यान विद्यार्थी व निमंत्रित रसिकांचा मिळणारा प्रतिसाद सकारात्मक उर्जा निर्माण करणारा होता. ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभाग कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठात नवनवीन उपक्रम राबवण्यासाटी ओळखला जात असून, या विभागाकडे परराज्यातील विद्यार्थीही आकर्षित होताना दिसत आहेत.
नाट्यसंहितेशिवाय संकुलातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यानीही ललित साहित्याचे वाचन केले. नाट्यसंहिता व ललित साहित्याच्या अभिवाचनात संजय मोरे, ओमकार बोरुळकर, प्रतिक इंगोले, अतुल साळवे, गजेस्वीनी देलमाडे, सिध्दार्थ कांबळे, अमित सोनकांबळे, प्रदीप गावंडे, गौरी चौधरी, अजिंक्य जाधन, श्रीनाथ पवार, आकाश जव्हार, प्रीती भोपाळे, मेघा गायकवाड, सविता भुरकुंडे, मानसी कुरकूट, गणेश महाजन आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा. राहुल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. किरण सावंत, निशिकांत गायकवाड व गजानन हंबर्डे यांनी परिश्रम घेतले.
मजकूर (Text Box) नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला रोजगाराभिमुख होतील- डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुलास भेट दिली असता, संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी त्यांचा सत्कार केला, सत्काराला उत्तर देताना डॉ. बिसेन म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात कलांच्या प्रशिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून, कला या छंदापुरत्या मर्यादित न राहता रोजगाराचे साधन होउ शकतील आणि त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्वाचे असल्याचे मत डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केले. यावेळी ओमप्रकाश झंवर (वाशिम) यांचीही उपस्थिती होती.