नांदेड| शहरातील प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्र्य तथा इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख डॉ.एल.एस.देशपांडे यांचे दि. ६ जानेवारी रोजी पहाटे ३ च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, शिक्षक रवींद्र, सुरेंद्र ही २ मुले, सुना, मुलगी सौ.ज्योती किवळेकर, जावई,६ नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास राहते घर कोसला समर्थनगर धनेगाव नांदेड येथून निघाली. जुन्या नांदेडमधील ब्रह्मपुरी तारातीर्थ घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर गंगाखेडकर यांनी प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांनी सुरुवातीला सायन्स कॉलेजमध्ये व नंतर प्रतिभा निकेतन महाविद्यालयात अनेक वर्षे इंग्रजीचे अध्यापन केले. नंतर त्यांनी प्राचार्य म्हणूनही उत्तम काम केले. इंग्रजी व मराठी विषयावर त्यांचे प्रभूत्व होते. करड्या शिस्तीचे भोक्ते व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी.मिळविली आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील १० पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.