शिवगिरी मठाकडून सर्व पक्षांशी चांगले संबंध ठेवले जात असतात. वार्षिक शिवगिरी यात्रेत राजकीय क्षेत्रातील पक्षांच्या नेत्यांना यात्रेकरूंना संबोधित करण्याची संधी दिली जाते. अलिकडच्या वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी यात्रेकरूंना संबोधित केले आहे. यंदा शिवगिरी मठाच्या कार्यक्रमात विजयन यांना आमंत्रित करण्यात आले होते.
त्यानुसार केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी वर्कला येथील श्री नारायण गुरु यांच्या समाधि स्थळावर 92 व्या शिवगिरी तीर्थक्षेत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात हजर होते. विरकलातील नारायण गुरु यांच्या समाधीवर शिवगिरी यात्रेच्या संदर्भात झालेल्या एक सभेत विजयन म्हणाले की, गुरुंचे सनातन धर्माचे प्रतीक म्हणून चित्रण करण्यासाठी एक संघटित प्रयत्न चालवला जात आहे. “गुरू कधीही सनातन धर्माचे प्रचारक किंवा पालन करणारे नव्हते. उलट, ते त्या काळाच्या नव्या युगासाठी सनातन धर्माचे पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे होते. विजयन यांनी पुढे सांगितले की, सनातन धर्माचे सार त्याच्या वर्णाश्रम पद्धतीत आहे, ज्याचा गुरुंनी स्पष्टपणे विरोध केला. “गुरू हे जातिवादाविरुद्ध उभे राहणारे व्यक्ती होते. त्यांचा नवा युगातील धर्म हा धर्माद्वारे परिभाषित केलेला नाही, तर तो लोकांच्या भल्यासाठी असलेल्या पद्धतीवर आधारित होता, धर्माच्या बाबतीत ते कोणतेही भेद करत नव्हते…त्यांना सनातन धर्माच्या चौकटीत बांधणे हे गुरुंच्या विरोधात पाप होईल,” असे ते म्हणाले.
त्यांनी समाजसुधारक श्री नारायण गुरूंना सनातन धर्माच्या कुशीत आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याची निंदा केली. विजयन यांनी त्यांच्या भाषणात सनातन धर्माला समाजातील जातीय विभाजनाचा पाया असलेल्या वर्णाश्रम धर्माच्या समान म्हटले. त्यांनी श्री नारायण गुरूंना सनातन धर्माचे पुरस्कर्ते म्हणून प्रचारीत करण्याच्या कामाला श्री नारायण गुरु यांच्या जातीव्यवस्थेवर आधारित दडपशाहीचे निर्मूलन करण्याच्या कार्याचा आणि मानवतावादी संदेशाच्या विरुद्ध असल्याचे मांडले.
विजयन म्हणाले, “श्री नारायण गुरूंना सनातन धर्माचे पुरस्कर्ते म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. ‘एक जात, एक धर्म, आणि लोकांसाठी एक देव’ असा पुरस्कार करणारे गुरू सनातन धर्माचे प्रवक्ते किंवा पुरस्कर्ते नव्हते. गुरूंनी सुधारणा करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. तुम्ही त्यांचा इतिहास तपासलात तर तुम्हाला ते कळेल, सनातन धर्म हा वर्णाश्रम धर्माशी समानार्थी किंवा अविभाज्य आहे, जो चातुर्वर्ण्य पद्धतीवर आधारित आहे. तो वंशपरंपरागत व्यवसायांचा गौरव करतो. पण श्री नारायण गुरूंनी काय केले? त्यांनी वंशपरंपरागत व्यवसायांचा अवमान करण्याचे आवाहन केले. मग गुरू सनातन धर्माचे पुरस्कर्ते कसे होऊ शकतात?” ते बोलले आज जेव्हा जग हा धर्माच्या हिंसेवर आधारित व्याख्या केल्या जात आहेत अश्या परिस्थितीत श्री नारायण गुरु यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. गुरु जय गोष्टींच्या विरुद्ध लढले, त्यांना त्याच गोष्टींचा समर्थक दाखवण्याचा प्रयत्न लोकांनी हाणून पडला पाहिजे, गुरूंना केवळ धार्मिक नेता किंवा संत म्हणून प्रचारीत करण्याचा विरोध झाला पाहिजे. गुरु यांचा कुठलाच धर्म किंवा जात नव्हती.
विजयन म्हणाले की या आदरणीय सामाजिक सुधारकांना सनातन धर्माशी जोडले जाऊ नये. विजयन यांनी सांगितले की, गुरुंच्या शिकवणी आणि कृती समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी आणि जातीय भेदभावाला विरोध करण्यासाठी होत्या, ज्या सनातन धर्माच्या तत्वांशी विसंगत आहेत. पुढे ते बोलले, “सनातन धर्म, जो सत्ताधारी आहे, त्यामुळे उत्तर भारतातील ग्रामीण भागात दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवर सतत अत्याचार होत आहेत.” त्यांच्या या विधानाने चवताळून भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याप्रमाणेच केरळच्या मुख्यमंत्र्यांवर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
19व्या शतकातील केरळमधील जातीय व्यवस्था अत्यंत कठोर आणि शोषणकारी होती. हिंदू समाज वेगवेगळ्या जातीय गटांमध्ये विभागलेला होता, ज्यात ब्राह्मण समाज उच्च स्थानावर होता, तर खालच्या जातींना भयंकर भेदभावाचा सामना करावा लागत असे. इझावा समाजासारख्या जातीय गटांना शिक्षण, मंदिर प्रवेश, आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार नाकारला जात होता. हे लोक प्रचंड दारिद्र्यात आणि अपमानकारक परिस्थितीत राहत होते. अशा दडपशाहीच्या वातावरणात श्री नारायण गुरु यांचा जन्म १८५५ मध्ये केरळमधील चेम्पाझंथी या छोट्या गावात इझावा कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता आणि अध्यात्मिक झुकाव विलक्षण होते. त्यांच्या समाजातील लोकांसाठी वर्ज्य ठरवल्या गेलेल्या संस्कृत आणि हिंदू धर्मग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले. त्यांचा विश्वास होता की देवत्व सर्व माणसांमध्ये समान आहे, ते जात आणि धर्मावर अवलंबून नाही. त्यांनी जातीय भेदभावाला आव्हान दिले.
श्री नारायण गुरु यांनी १८८८ मध्ये अरुविप्पुरम नदीकाठी शिवलिंगाची स्थापना करून ब्राह्मणांच्या वर्चस्वाला खुले आव्हान दिले, कारण मंदिर स्थापनेचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. हा विधी स्वतः पार पाडून, त्यांनी सांगितले की आध्यात्मिकता सर्वांसाठी आहे, ती कोणत्याही जातीपुरती मर्यादित नाही. जेव्हा गैर-ब्राह्मणांनी केलेल्या अभिषेकाला विविध स्तरातून विरोध झाला, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की ही मूर्ती “ब्राह्मण शिवची नव्हे तर इझवा शिवची” होती आणि इझवा समाजाचा अत्याचारग्रस्त जात म्हणून उल्लेख केला. यानंतर त्यांनी केरळभर अनेक मंदिरे स्थापन केली, जी फक्त उपासनेसाठी नसून शिक्षण आणि सामाजिक सुधारणा केंद्रे बनली. “एक जाती, एक धर्म, एक देव” हा त्यांचा प्रसिद्ध घोषवाक्य बनला, ज्याने जातीवादी विभागणीला स्पष्टपणे नाकारले. त्यांचा विश्वास होता की देवत्व सर्व माणसांमध्ये समान आहे, ते जात आणि धर्मावर अवलंबून नाही. त्यांनी जातिवाद आणि अस्पृश्यतेने ग्रासलेल्या समाजाचे किमान काही स्तरांसह प्रगतीशील समाजात परिवर्तन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १८८८ मध्ये, मंदिर प्रवेशाच्या हालचाली आणि समानताच्या घोषणांच्या अनेक दशकांपूर्वी त्यांनी अत्याचारित जातींना मंदिरात प्रवेश मिळवून दिला.
श्री नारायण गुरु यांनी शिक्षणाला मुक्तीचे एक प्रभावी साधन मानले. त्यांनी शाळा स्थापन केल्या आणि जातीभेद झुगारून लोकांना शिक्षण घेण्याचे आवाहन केले. अशा प्रकारे, त्यांनी दुर्बल घटकांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी मंदिरांच्या माध्यमातून ग्रंथालये आणि वाचनालये उभारली, ज्यामुळे सर्वांना ज्ञान मिळाले. या उपक्रमामुळे शिक्षणाचे लोकशाहीकरण झाले आणि समाजात एकता आणि सामुदायिक भावना निर्माण झाली. श्री नारायण गुरु यांनी अस्पृश्यता आणि जातीआधारित बंधनांच्या विरोधात सक्रियपणे प्रचार केला. त्यांनी शोषितांमध्ये आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा जागवली. कमीपणाची भावना झुगारून त्यांनी लोकांना संघटित होऊन आपल्या अधिकारांसाठी लढण्यास प्रवृत्त केले. त्यांनी जातीभेद मोडून काढण्यासाठी अंतरजातीय भोजनाला पाठिंबा दिला, जी त्या काळात निषिद्ध गोष्ट होती. त्यांनी समाजातील कट्टरतेच्या भिंती पाडण्यासाठी प्रयत्न केले.
श्री नारायण गुरु हे केवळ सामाजिक सुधारकच नव्हे तर महान तत्त्वज्ञ आणि कवीही होते. त्यांच्या लेखनातून करुणा, समानता आणि न्याय यासारख्या सार्वत्रिक मूल्यांचा प्रचार झाला. “आत्मोपदेश सतक” (शंभर ओव्या आत्मशिक्षणासाठी) आणि “दैव दशकम” (दहा श्लोक देवासाठी) यांसारख्या त्यांच्या रचनांनी जातीय भेदभावाविरुद्धचा त्यांचा संदेश स्पष्ट केला. त्यांचे तत्त्वज्ञान सर्वसमावेशक होते. अद्वैत वेदांताचा आधार घेत त्यांनी ते त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीस अनुरूप रीतीने मांडले. सर्व मानव एकाच तत्त्वावर आधारित असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले आणि समाजसुधारणांसाठी आध्यात्मिक पाया निर्माण केला. केरळमध्ये आध्यात्मिकतेला सामाजिक सुधारणेशी जोडण्यासाठी गुरुंचे शिक्षण अद्वैत वेदांत म्हणून ओळखले जाते. हे “अद्वैत” म्हणजे “अखेरचे सत्य” किंवा “ब्रह्म” हे एकच आणि अपरिवर्तनीय आहे, आणि “व्यक्तिगत आत्मा” किंवा “आत्मा” हा या सार्वभौम तत्त्वाशी एकरूप आहे. “अज्ञान” हेच “द्वैत” (द्वंद्व) ची भ्रांती निर्माण करते, ज्यामुळे जात, धर्म आणि इतर पृष्ठभूमीवरील ओळखींच्या आधारे विभाग निर्माण होतात, असे गुरुंनी सांगितले. त्यांचे साधे, परंतु क्रांतिकारी घोषवाक्य होते, “एक जात, एक धर्म, एक देव माणसासाठी”, आणि त्यांनी सर्व जातींना समर्पित मंदिरे खुले करण्याचे प्रोत्साहन दिले.
श्री नारायण गुरु यांच्या प्रयत्नांनी केरळ समाज आणि त्यापलीकडेही बदलांची मूल्ये रूजली आणि त्यांना धार्मिक-आध्यात्मिक स्वरूपात देखील पाठिंबा मिळाला. त्यांच्या चळवळीने इझावा आणि इतर दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचा आत्मविश्वास दिला. कालांतराने, त्यांच्या विचारांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठीच्या चळवळींना प्रेरणा दिली. नारायण गुरु हे पेरियार यांच्याप्रमाणे कडवे नास्तिक नव्हते. ते सनातन धर्माला पूर्णपणे नाकारत नव्हते, तर उपासनेची मक्तेदारी काही मूठभर लोकांच्याच हातीएकवटू नये व ते शोषितांसाठीही उपलब्ध व्हावे यावर ते ठाम होते. आध्यात्मिकतेचा मार्ग व अधिकार सर्व जातींना एकसारखा असावा आणि ब्राम्हणयवादी मक्तेदारी मोडून काढावी म्हणून त्यांनी निश्चितच प्रयत्न केले. डावे पक्ष त्यांना एक सामाज सुधारक म्हणून पाहतात. डाव्या चळवळीला पोषक अशी पुरोगामी पार्श्वभूमी या धार्मिक सुधारणावादी चळवळीने मिळाली.
श्री नारायण गुरु हे आधुनिक दक्षिण भारतातील एक महान सामाजिक सुधारक होते. त्यांनी भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या जातीय व्यवस्थेवर प्रखर प्रहार केला. आध्यात्मिक गुरू, तत्त्वज्ञ आणि दूरदर्शी नेता म्हणून, नारायण गुरु हे विशेषतः केरळमधील समाजातील दुर्बल घटकांसाठी आशेचा किरण ठरले. त्यांच्या कार्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात सामाजिक व सांस्कृतिक पुनर्जागरणाची सुरुवात झाली. जातीवादी वर्चस्वाच्या त्या विशिष्ट परिस्थितीला विरोध करणारे श्री नारायण गुरूंनी व्यापक आणि सर्वसमावेशक ‘एक जात, एक देव, मानवजातीसाठी एक धर्म’ तत्त्वज्ञान मांडले. त्यांचा प्रभाव फक्त खालच्या जातींपुरता मर्यादित नव्हता; अनेक प्रबुद्ध विचारवंत आणि उच्चवर्णीय नेत्यांनीही त्यांचे तत्त्वज्ञान समजून त्याला मान्य करत बदल घडवण्यासाठी आत्मसात केले. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या नेत्यांवरही त्यांचा प्रभाव पडला. गांधीजींनी त्यांना भेटल्यानंतर त्यांना “पूर्ण माणूस” आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे खरे प्रतिनिधी म्हटले. इतिहासात त्यांचे स्थान एक महान सुधारक म्हणून कायम आहे.
अत्याचारग्रस्त जातींच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी १९०३ मध्ये श्री नारायण धर्म परिपालन योगम (एसएनडीपी योगम) ची स्थापना केली. एक शतकापूर्वी शिवगिरी आश्रमाची स्थापना करणारे श्री नारायण गुरु हे केरळच्या अग्रगण्य समाजसुधारकांपैकी एक मानले जातात. परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की व्यापक दृष्टीने काम करण्याऐवजी श्री नारायण धर्म परिपालन योगम केवळ इझावा जाती-समाजाच्या लोकांचा वर्चस्व असलेली संघटना बनत गेली, तेव्हा ते निराश झाले आणि एका दशकानंतर, त्यांनी एसएनडीपी योगमपासून स्वतःला अलिप्त केले. गुरूंनी स्थापन केलेले व त्यांची समाधि असलेले शिवगिरी हे आता इझावांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
केरळच्या लोकसंख्येच्या 23% भाग असलेल्या इझावा समुदायाला इतर मागास जाती म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) नेतृत्वाखालील एलडीएफचे पारंपारिक मतदार मानले जाते, ज्यात काही मतं यूडीएफ कडे जातात. समाजात धार्मिक गोष्टी मानणारे परंतु कर्मकांड, जातीवाद आणि ब्राह्मणी वर्चस्ववादाचा विरोध करणारे बरेच आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे, श्री नारायण धर्म परिपालन योगमने राम मंदिराच्या अभिषेकाचे स्वागत केले असतानाच, त्याचे शिवगिरी मठाचे अध्यक्ष स्वामी सच्चितानंद यांनी अयोध्या अभिषेक सोहळ्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आजवर मठा नेतृत्वाने प्रमुख मंदिरांमधील पुजारीपद्धतीच्या “ब्राह्मणवादी वर्चस्व” विरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर केला आहे. त्यांनी मोठ्या मंदिरांमध्ये पुजारी पदे ब्राह्मण समाजापुरती मर्यादित करण्यावर त्यांनी टीका केली आहे. स्वामी सच्चितानंद यांनी या कार्यक्रमात “मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांना त्यांचे शर्ट काढायला लावण्याची ‘दुष्ट’ प्रथा सोडली पाहिजे. पूर्वीच्या काळात वरच्या जातीच्या लोकांनी पुनूल (जानेऊ) घातलेले आहे की नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी ही प्रथा पडली. ही प्रथा आजही मंदिरात चालू आहे. श्री नारायण सोसायटी या प्रथेला बदलू इच्छिते” असे मत व्यक्त केले. पिनराई विजयन यांनी स्वामी सच्चितानंद यांच्या या मताचेही समर्थन करत हे नारायण गुरु यांच्या परंपरेला धरून होईल आणि त्याने सामाजिक बदल होतील असे मत व्यक्त केले.
वेगवेगळ्या काळात भक्ति संप्रदायात व धार्मिक समाजसुधारकांनी हिंदू धर्मातील चालीरीती, अंधश्रद्धा, ब्राह्मणवादी कर्मकांड, जातीवाद यावर आपापल्या पद्धतीने टीका केली आणि आपापले समर्थक, भक्त व पंथ निर्माण केले. या सर्व धर्म सुधारकांनी समाज सुधारणा करण्यासाठी जे काही लिहिले, बोलले, त्यामुळे तात्कालिक धर्म पीठाधीशांच्या खुर्चीला धक्का लागल्याने त्यांना विरोध देखील सहन करावा लागला. परंतु आज धर्मावर काहीही म्हटल्यावर वाद माजवून मतांचे भांडवल करण्याचा आरएसएसचा यशस्वी फॉर्म्युला आहे. या पद्धतीने भाजप वगळून इतर सर्व पक्षांना सनातन-हिंदू विरोधी आणि मुस्लिम तुष्टीकरण करणारे म्हणून सगळीकडे बदनाम करण्यात येते. त्या त्या समाजात संघटना, जयंत्या, मंदिरे, पीठ यावर कब्जा मिळवून धार्मिक मतांचे ध्रुवीकरण केले जाते. ब्राह्मणवाद, जातीवाद आदींवर रोखठोक भूमिका घेणाऱ्या कम्युनिस्टांना धर्मविरोधी, सत्तानिरोधी, हिंदू विरोधी घोषित करण्याचा प्रचार केला जात आहे. केरळमध्ये भाजपकडून धार्मिक संघटना, संस्था आणि धर्मगुरूंना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम जोरात सुरू आहे. मठाला मानणाऱ्या समाजाचा काही भाग हिंदुत्वाकडे वळत आहे. अनेक समाज सुधारकांना संघाने आणि भाजपने अशाच प्रकारे हायजॅक केले आहे.
भाजप इझावा समाजात आपला आधार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपकडे आधीच मोठ्या प्रमाणावर उच्च जातीची हिंदू मतं आहेत. इझावा समुदायाची मुख्य संघटना, श्री नारायण धर्म परिपालन योगमचा एक राजकीय प्रभाव आहे. पिनराई विजयन यांच्या श्री गुरु संदर्भातल्या व्यक्तव्याचा वापर भाजपकडून सीपीआय(एम)ला लक्ष्य करून धार्मिक ध्रुवीकरणासाठी केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एलडीएफचा अनेक ठिकाणी पराभव झाला आणि भाजपने डाव्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. श्री नारायण धर्म परिपालन योगमचे अध्यक्ष वेल्लापल्ली नटेसन केरळमधील सत्ताधारी सरकारांना समर्थन देत आले आहेत. तथापि, त्यांचा मुलगा तुषार वेलप्पल्ली, जो एसएनडीपीच्या राजकीय शाखेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, भाजपला पाठिंबा देतो. आता एसएनडीपी योगममध्ये उघड भाजपसमर्थक लोकांचा भरणा माकपसाठी नुकसानदायक आहे.
सध्या भाजपला हा आयता मुद्दा सापडला आहे. नायर सेवा सोसायटी ह्या उच्च जातीच्या संघटनेसोबत विजयन यांच्यावर टीका सुरू केली. अर्थात टीकेचे मुद्दे तेच जुने की ‘रूढी परंपरांना बदलण्याचा आग्रह का धरला जात आहे? इतर धर्मांच्या रूढी परंपरेवर टीका का केली जात नाही. रूढी-परांपरांना ‘दुष्ट’ म्हणण्याचा त्यांना काय अधिकार वगैरे. मात्र आता आरएसएसकडून केरळमध्ये प्रवेश करण्याच्या व निवडणुकीची रणनीतीचा एक भाग म्हणून, इझावा समुदायाला जवळ केलं जात आहे आणि या पुरोगामी समाजसुधारकांना मानणाऱ्या लोकांना धारेवर धरलं जात आहे. समाजाच्या राजकीय भाराची जाणीव असलेल्या मठाने आपले पत्ते अजून उघडले नाहीत. बहुतेक त्यांच्यातले राजकीय-धार्मिक विरोधाभास आणि आर्थिक पाठबळ व सुविधांची गरज याचे मुख्य कारण असावे आणि असे असणे चिंताजनक आहे.
लेखक..- एड. संजय पांडे (9221633267), adv.sanjaypande@gmail.com