मुंबई| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.याक्षेत्रातील बारीक बारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करावे. शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करावे. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवावे. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करावे, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करावी. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करावी अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असणार आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे. याभागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे.यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असुन अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवी मुंबई विमानतळ 85 टक्के पूर्ण झाले आहे. त्याची क्षमता मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण व कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
नाईट लँडींगची सुविधा असलेल्या विमानतळांविषयी असलेल्या अडचणी सोडवाव्यात. विमानतळांच्या कामांना होत असलेल्या उशिराची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा आणि कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी नवी मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळां विषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले काम, उर्वरित कामासाठी लागणारा कालावधी, प्रलंबित परवानग्या, आर्थिक बाजू, भू-संपादन अशा विविध विषयांचा आढावा घेतला. याबरोबर राज्यातील सर्व विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.
यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सह सचिव रुबिना अली, असंगबा चुबा एओ, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव आदी उपस्थित होते.