श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पंतप्रधान आवास योजने (Pradhan Mantri Awas Yojana)च्या लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान तात्काळ द्या अशा मागणीचे निवेदन कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वात हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत माहूर नगर पंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे यांना आज दि. २१ जानेवारी रोजी देण्यात आले आहे.

गरिबाना हक्काचा निवारा मिळावा या उद्दात हेतूने मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अडीच लाखां पैकी १ लाख १० हजार रु. १५०० लाभार्थ्यांचे अनुदान सन २०१७ पासून रखडले असल्याने कॉंग्रेस चे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्यत पोहचविले असून या बाबत संसदेच्या सत्रात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे खा.नागेश पाटील व खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले असल्याची माहिती तूपदाळे यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निधीतून घरकुल लाभार्थ्यांना २ लाख ५० हजार अनुदान देण्याची तरतूद आहे. सन २०१७ पासून आज पर्यत जवळपास १ हजार ५०० लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले. अनेक लाभार्थ्यांनी निवास करीत असलेली जुने घरे पाडून मंजूर घरकुलाचे बांधकाम सुरु केले. सुरुवातीला काही हप्ते लाभार्थ्यांना नियमित हप्ते सुद्धा मिळाले. आजतागायत लाभार्थ्यांना केवळ १ लाख ४० हजार रुपये अनुदान मिळाले असून उर्वरित १ लाख १० हजार रुपये अजूनही प्रलंबित आहेत.

याबाबत स्थानिक नगर पंचायत सह नगरविकास विभाग मंत्रालया पर्यत पाठपुरावा केला विविध आंदोलने व आमरण उपोषणे केली. परंतु अद्यापही रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. नगर पंचायत प्रशासनास निधी आला की लगेच वितरीत करू एवढेच आश्वासन देत आहेत. त्यामुळे आता थेट पंतप्रधान कार्यालय गाठून तिथेच माहूर तीर्थक्षेत्रातील घरकुल लाभार्थ्याची कैफियत सादर करणार असल्याचे तुपदाळे म्हणाले.

घरकुल मंजूर झाल्याने आनंदी असलेल्या लाभधारकांनी घरकुल बांधकामचे नियोजन केले. घरकुल हप्ते वेळेत मिळतील ही अपेक्षा ठेऊन प्रसंगी खाजगी कर्जे घेऊन घरकुलाचे बांधकाम करून घेतले तर अनेकांचे घरकुलाचे काम अर्धवट आहेत. अनेक लाभार्थ्यांनी जुने पडके घर पाडल्याने व नवे घरही अनुदानाअभावी पूर्ण झाले नसल्याने बेघर बनल्याची स्थिती निर्माण झाली आहे