किनवट, परमेश्वर पेशवे l पाणी टंचाईग्रस्त पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल शंकरराव महामुने यांनी मोठ्या परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून एमपीएससी परिक्षेत उज्ज्वल यश मिळवून ” ‘प्रथम श्रेणीअधिकारी ‘अ’ पदाला गवसनी घातल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. अतिदूर्गम पाचोंदा येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य रमाबाई व शंकरराव महामुने यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं बाळकडू पाजलं. शिक्षणावर भर देवून त्यांनी तिन्ही मुलं शिक्षक केली.
त्यांचा मोठा मूलगा अनिल महामुने हे शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रवास करत, माजी गट शिक्षणाधिकारी व पीएम पोषण आहार शक्ती निर्माण योजना अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगाही शिक्षक आहे. राहूल महामुने हा त्यांचा धाकटा मुलगा. राहूलचे प्राथमिक शिक्षण पाचोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले.
पनवेल येथून डी.एड् उत्तीर्ण झाल्यानंतर शासकिय आश्रम शाळा झराळा येथे सह शिक्षक म्हणून रूजू झाले. बदलीनंतर शासकीय आश्रम शाळा सारखणीत आले येथे ते विद्यार्थी प्रिय गुरुजी ठरले. याच परिक्षेत्राचे शिक्षण विस्तार अधिकारी असलेले मोठेबंधू अनिलकुमार महामुने यांनी सदैव त्यांना प्रेरणा दिली.
अन् त्यांच्यामुळेच राहूल स्पर्धा परिक्षेच्या तयारीला लागले. पहिल्याच परिक्षेत उत्तीर्ण होऊन ते गृहपालपदी नंदूरबार येथे रुजू झाले. तेवढ्यावरच समाधान न मानता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) परीक्षा देण्याची जिद्द उराशी त्यांनी बाळगली.
त्यातच सन 2020 मध्ये एमपीएससीची वरिष्ठ संशोधन अधिकारी/ सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी गट ‘अ’ या आदिवासी विकास विभागातील सरळसेवा पदभरतीसाठी जाहिरात आली. फार्म भरून कठोर परिश्रम व अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षा दिली. परीक्षा तेव्हाच झाली ; परंतु 28 नोव्हेंबर 2024 रोजी आलेल्या निकालात राहूल महामुने हे महाराष्ट्रातून प्रथम आले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पाणी ही नित्य समस्या असणाऱ्या पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकरी रमाबाई व शंकरराव महामुने या दाम्पत्यांनी लेकरांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांचे काका गौतमराव महामुने, रमेश महामुने, परमेश्वर महामुने व विश्वनाथ महामुने यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले. यामुळेच ते आज यशाची पायरी चढत आहेत. हे इतर शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे.