हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील घारापुर वळण रस्त्याजवळ आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे बांधकाम कोट्यवधी रुप्याच्या निधीतून सुरु आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचे इमारतीच्या अनियमित बांधकामावरुन दिसून येत आहे. एव्हढेच नाहीतर या ठिकाणी माहितीचा बोर्ड देखील लावण्यात आला नसून, भेट रजिस्टर मेंटेनं केले जात नसल्याने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कामात मोठी हेराफेरी केली जात असल्याचा संशय वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीप आला राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
मागील आठ महिन्यापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील तामसा – फुलसांगवी राष्ट्रीय महामार्गावरील घारापुर वळण रस्त्याजवळ आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे बांधकाम मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आले आहे. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम सुरु केल्याचे समोर आल्यानंतर दोन तीन दिवसापासून वर्तमान पत्रात वसतिगृहाच्या निकृष्ट बांधकामा संदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. याची दिलीप राठोड यांनी दखल घेऊन माझ्या तालुक्यात यापुढे बोगस कामे चालू देणार नाही असा पवित्र घेतला आहे. दिनांक २९ शुक्रवारी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकाम स्थळी भेट देऊन पाहणी केली.बांधकामाच्या ठिकाणी मातीमिश्रित रेतीच्या मोठे ढिगारे दिसून आले. या ठिकाणी कोणतेही माहिती फलक सुद्धा लावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्या योजनेतून बांधकाम होयंत किंवा कोण..? करत आहे. संबंधित एजन्सीचे नाव, ठेकेदार व अभियंता, कामाची सुरुवात व मुद्दत याबाबतची कोणतीच माहिती मिळत नाही. सर्वांना अंधारात ठेवून ठेकेदाराकडून मातीमिश्रित रेतीचा वापर करून थातुर माथूर पद्धतीने अंदाजपत्रकाराला बगल देऊन बांधकाम करत असल्याचे दिसून आले आहे.
वस्तीग्रह बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्य, इमारत परिसरामध्ये पाहणी केली. बांधकामासाठी उभे करण्यात आलेल्या पिल्लरला कुठे कुठे तडे जाऊन कोडेले पिल्लर दिसत आहेत. ते झाकण्यासाठी चक्क सिमेंटचा लेप त्यावर लावले आहेत. त्यामुळे या बांधकामाविषयी शंका निर्माण झाली असून, याची गुण नियंत्रण मापक मशीन द्वारे तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या संदर्भात संबंधित आदिवासी प्रकल्प विभाग किनवट, नाशिक, अमरावती, या ठिकाणी जाऊन तक्रार देऊन कामअंदाज पत्रकाप्रमाणे दर्जेदार करून देण्याची मागणी करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीप राठोड यांनी बांधकामावर असलेल्या व्यक्तीशी विचारणा केली असता उडवा उडावीच उत्तरे मिळाली. तसेच भेट देणाऱ्यांसाठी येथे रजिस्टर देखील ठेवले नसल्याची बाब समोर आली आहे. बालविकास प्रकल्प अधीकारी किनवट अंतर्गत चालू असलेल्या बांधकामावर संबंधित अभियंता देखील उपस्थित नव्हता. त्यामुळे सुरु असलेल्या २४ कोटीच्या निधीतील वसतिगृहाच्या बांधकामाबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. एकूणच हा सर्व अलबेल प्रकार पाहता बोगस पद्धतीने वसतिगृहाचे बांधकाम होत असल्याचा आरॊप दिलीप राठोड यांनी केला आहे.
याबाबत दिलीप राठोड म्हणाले कि, होत असलेल्या वसतिगृहात विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेणार आहेत. त्यामुळे इमारतीत वास्तव्य करताना त्यांच्या जीवनमरनाचा प्रश्न समोर येणार आहे. मागील काळात हिमायतनगर येथील तहसीलच्या पंचायत समिती कार्यालयाचे छत कोसळले होते. तसाच प्रकार या इमारतीच्या बांधकामाच्या निकृष्ट प्रकारामुळे होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. याची चौकशी नाही झाल्यास या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.