नांदेड| आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी महापालिका आणि तहसील प्रशासन पटाईत आहे. दोन्ही ठिकाणी सर्व कामे अर्थपूर्ण संबंधातूनच होतात अशी परिस्थिती आहे. घरामध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या पीडितांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे शहरातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.
गेल्या वर्षी नऊ कोटी रुपये निधी सीटू कामगार संघटनेने ३५ वेगवेगळी आंदोलने करून खेचून आणला होता. गेल्या वर्षीचे हजारापेक्षा अधिक पूरग्रस्तांना अनुदान वाटप झाले नाही. या वर्षी देखील सीटूने विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आणि करोडो रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर करून घेतले. पन्नास टक्के बोगस लोकांना पात्र दाखवून मनपाचे वसुली लिपिक आणि तहसीलचे तलाठी यांनी संगणमताने मोठ्या प्रमाणात घोटाळा करून अनियमितता केली परंतु दोन्ही कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले.
यावर्षी देखील चार हजार लाभार्थ्यांना पहिल्या टप्यात प्रत्येकी दहा हजार प्रमाणे पैसे बँक खात्यात वर्ग करण्यात आले. परंतु खरे पूरग्रस्त अनुदानापासून याही वर्षी देखील वंचित आहेत. त्यासाठी दि.२ डिसेंबर रोजी तहसीलदार आणि दि.९ डिसेंबर रोजी मनपा आयुक्तांना सीटूच्या वतीने घेराव घालण्यात आला. तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सकारात्मक चर्चा केली परंतुमहापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे असे म्हणणे आहे की,आमचा पूरग्रस्तांच्या संदर्भात काही एक संबंध नाही. असे जबाबदार अधिकाऱ्यांनी म्हणणे अत्यंत चुकीचे असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
दि.५ डिसेंबर पासून जमसं राष्ट्रीय महिला संघटनेचे पाठिंबा स्वरूपात साखळी उपोषण मनपा समोर सुरु आहे. पूरग्रस्तांचे अर्ज न स्वीकारणारे झोन क्र. चार चे वादग्रस्त क्षेत्रीय अधिकारी श्री संजय जाधव व इतरांना जी पदोन्नती देण्यात आली आहे ती रद्द करावी कारण त्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मनपाचे दोषी वसुली लिपिक व तहसीलचे तलाठी यांच्यावर कारवाई करावी.खऱ्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा. अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सीटू कामगार संघटनेने दिला आहे.घेराव आंदोलनात शकडो कामगार व पूरग्रस्त सामील झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.ज्योती सरपाते, कॉ.क्रांती सदावर्ते, कॉ.चंद्रकांत लोखंडे आदींनी केले.