MLA Prataprao Patil Chikhlikar : महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख होत आहे – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
२८ पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ

• सातबारा व फेरफार उतारे मार्गी
• लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप
• विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल


लोहा| सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली निघावेत आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोहा तालुक्यातील कलंबर (बु.) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यास मदत होत असून प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित हे शिबिर शनिवारी (१४ मार्च) कलंबर (बु.) येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडले. उपविभागीय अधिकारी विलास नरवटे आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी माजी सभापती बाबुराव मुक्कानवार, साहेबराव काळे गुरुजी, बीडीओ कुळकर्णी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी राठोड, उपअभियंता नरबीतवार, अभियंता सोमवंशी, तालुका कृषी अधिकारी कासराळे, तालुका आरोग्य अधिकारी कांबळे, तालुका भूमिअभिलेख अधिकारी काळेवाड, नायब तहसीलदार अशोक मोकले, राजेश पाठक, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संदीप हाडगे, पुरवठा निरीक्षक नागार्जुन खैरे, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भुनेश्वर विभुते, मंडळ अधिकारी शिवकांता पवार, सीमा नाशिककर, अजयसिंग ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

आमदार चिखलीकर यांनी सांगितले की, महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून संबंधित सर्कलमधील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे जागीच मार्गी लागत आहेत. विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल उभारल्यामुळे शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. अशा प्रकारच्या शिबिरांची गरज असून प्रशासन नागरिकांच्या अधिक जवळ येत असल्याचा आनंद वाटतो.
यावेळी आमदारांनी विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, भूमिअभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पशुधन विकास तसेच शिक्षण विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.
तहसील कार्यालयाच्या वतीने महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. ऑनलाईन सातबारा उतारे, आठ-अ उतारे व फेरफार उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच २८ पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले तसेच शिधापत्रिका दुरुस्ती संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.
शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा व ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आरोग्य, भूमिअभिलेख व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.
उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी मार्गदर्शन केले, तर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी सुगावे यांनी केले.
या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला. तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



