लेखनांदेड

World Mosquito Day ; जागतिक डास दिन – २० ऑगस्ट

माननीय संचालक, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य सेवा, महासंचानालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व मा. डॉ.संदीप सांगळे साहेब, सह संचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जल जन्य रोग) पुणे-६ यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी पत्र निर्गमित करून ” जागतिक डास दिन ” दि. २० ऑगस्ट रोजी साजरा करणे बाबत सूचित केले आहे. माझे गुरुवर्य राज्य किटक शास्त्रज्ञ पुणे, मा. डॉ. महेंद्र जगताप सर, मा. डॉ. सोमाजी अनुसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार ” जागतिक डास दिन ” बद्दल लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे.

देशात किटकजन्य आजार (VBDs) ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख समस्या आहे. सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये मादी अॅनोफिलीस डासांद्वारे मानवी हिवतापाचा प्रसार होतो असा शोध लावला होता. दरवर्षी, दिनांक २० ऑगस्ट रोजी सर रोनाल्ड रॉस यांच्या वाढदिवसानिमित्त “जागतिक डास दिन (WMD)” साजरा केला जातो. ” जागतिक डास दिन (WMD)” साजरा करण्याचा मुख्य उद्देश डासांचे प्रसार रोखणे व नियंत्रण करणे हा आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी विविध स्तरांवर समाजातील विविध घटकातील लोकांचा सहभाग वाढविणे तसेच डास नियंत्रणाकरीता एकात्मिक किटकशास्त्रीय उपाययोजना राबविणे असा आहे.

या वर्षी ” जागतिक डास दिनाची (WMD) ” मुख्य संकल्पना ” हिवताप विरुद्धच्या लढाईला जगासाठी अधिक अतिगतीमान करूयात ” (“Accelerating the Fight Against Malaria for a More Equitable World”), जे की हिवताप निर्मूलनाकरीता प्रभावी व तात्काळ उपाययोजना अंमलबजावणीच्या प्रयत्नावर भर देते. विशेषतः सर्वांत दुर्गम आणि अतिदुर्गम लोकसंख्येसाठी किटकजन्य आजारांचा प्रतिबंध, निदान आणि उपचार सेवा पोहोचविणे, सुनिश्चित करणे हे आहे.

NCVBDC अंतर्गत हिवताप आणि इतर किटकजन्य आजार प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलनासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापनेतंर्गत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि किटक नियंत्रणाचे महत्त्व है महत्वपूर्ण धोरणांपैकी एक आहे. याकरीता आपण सर्वांनी जाणीवपूर्वक आणि वचनबद्धतेने “जागतिक डास दिन (WMD)” साजरा करू या. हिवताप प्रतिबंध, लवकर निदान आणि वेळेत व संपुर्ण उपचार यावरील प्रमुख संदेशांना प्रोत्साहन देण्यासाठी संदेश प्रसारित करताना डेंग्यू आणि चिकनगुनियासह सर्व किटकजन्य आजारांचा संदेश प्रसारणामध्ये समावेश सुनिश्चित करावा.

प्रभावी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यासाठी आंतर विभागीय समन्वय खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये विविध विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एकात्मिक किटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि अधिक काळ टिकणारे नियंत्रण उपाययोजना राबविण्याकरीता ग्रामीण विकास, शहरी स्थानिक संस्था, शिक्षण, आदिवासी यासारख्या विभागांसह समन्वय व सहभाग प्राप्त करून घेऊन या साथरोगांचा प्रतिबंध करावा, जनतेच्या सहभागाने पर्यावरण पुरक एकात्मिक किटकशास्त्रीय सर्वेक्षणाव्दारे डासोत्पती स्थाने नष्ट करणे, साठलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्याचे साठे रिकामे करणे, झाकून ठेवणे तसेच वाहते करणे, कोरडा दिवस पाळणे, जीवशास्त्रीय उपाययोजना (गप्पी मासे सोडणे) करावेत.

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्वरीत निदानाद्वारे रुग्ण शोध घेऊन तात्काळ व समुळ उपचार करावेत. मा. संचालक, NCVBDC, आरोग्य सेवा महासंचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्राव्दारे उपरोक्त उल्लेख केलेल्या बाबीचा समावेश करुन दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी “जागतिक डास दिन (WMD)” साजरा करून सन २०३० पर्यंत हिवताप निर्मूलनाच्या राष्ट्रीय ध्येया साठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा निश्चित करूयात. या मोहिमेत कोणीही मागे राहणार नाही याची खात्री व प्रयत्न करुन, हिवतापमुक्त आणि निरोगी भारताचे स्वप्न साकार करु.

राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची लातूर विभागात प्रभावी अंमलजावणी मा. डॉ. अर्चना भोसले – किर्दक मॅडम, उप संचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ, मा. डॉ. हणमंत वडगावे साहेब, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर, नांदेड जिल्ह्यात मा.डॉ. संगीता देशमुख मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा. डॉ. संजय पेरके सर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ. अमृत चव्हाण सर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, मा. डॉ. प्रताप चव्हाण सर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, सर्व वैद्यकीय अधिक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे.

जागतिक डास 🦟 दिन : संक्षिप्त टिपण… आज २० ऑगस्ट ” जागतिक डास दिन” याच दिवशी २० ऑगस्ट १८९७ रोजी डॉ रोनाल्ड रॉस यांनी कलकत्ता येथे हिवतापाचे जंतू हे डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला व हा शोध आपल्याच देशात लावल्याने या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे हा दिवस जागतिक मच्छर (डास) दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जगामध्ये डासांच्या जवळ जवळ ३५०० प्रजाती आहेत या प्रजाती साधारणत: अनोफेलीस, क्युलेक्स , एडीस व मंसोनिया चार जमातींमध्ये विभागलेले आहेत. या चार जमाती वेवेगळ्या आजारांचा प्रसार करतात. अनाफेलिस डासापासून हिवतापाचा प्रसार होतो, कुलेक्स डासा पासून हत्तीरोग व जपानी मेंदुज्वर या आजाराचा प्रसार होतो तर एडीस डासापासून झिका, डेंग्यू चिकन गूनिया या आजारांचा प्रसार होतो तर मंसोनिया डासापासून हत्तीरोग होत असतो. हे विविध आजार पसरविणारे डास व आजार यांची वैशिष्टे खालील प्रमाणे

हिवतापाचे प्रसार करणारे डास:- हिवताप हा एक थंडी वाजून येणारा ताप असून या आजाराचे सर्वाधिक प्रमाण हे आफ्रिकेमध्ये व त्यानंतर आशिया खंडामध्ये दिसून येते या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे अनाफेलिस. महाराष्ट्रामध्ये ॲनाफिलीस या डासाच्या तीन प्रजाती पासून हिवताप होत असतो त्या आहेत अनोफेलिस क्युलिसीफिसेस, अनोफेलिस स्टिफेंसी, अनोफेलिस फ्लुवातलीस या डासांच्या जीवनशैलीचा जर विचार केला तर हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालत असतो. या डासाच्या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर तरंगत असते. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात व हा डास भिंतीशी 45 अंशाचा कोन करून बसतो. हे डास रात्री अथवा पहाटे चावत असतात शक्यतो गाढ झोपे मध्ये असतानाच हे डास लोकांना चावत असतात एकदा चावल्यानंतर हा डास तीन दिवस पूर्णपणे भिंतींवर विश्रांती घेत असतो त्यामुळे या डासाच्या प्रतिबंधासाठी आपण घरोघरी नियमित फवारणी केली जाते किंवा कीटकनाशक भारीत मच्छरदानीचा वापर केला जातो.

डेंगी, चिकनगुनिया व झिका आजार :- हा आजार हा एडीस डासाच्या प्रजाती पासून होतो. महाराष्ट्रामध्ये या प्रजातीच्या तीन प्रजाती य आजारांचा प्रसार करतात. एडीस इजीप्ताय, एडीस अल्बोपिक्टस व एडीस विटाटस यांचे मार्फतच या आजारांचा प्रसार होत असतो या डासांची वैशिष्ट्य म्हणजे यांच्या अंगावर आणि पायावर पांढरे पट्टे दिसून येतात तसेच रंगाने काळपट असतात. हे डास दिवसा चावतात व वारंवार चावतात. त्यामुळे घरातील सर्व लोक बाधित करण्याची शक्यता असते. हे डास विश्रांतीसाठी लोबकळणारे वस्तू, पडदे, वायर या वरती तसेच अंधाऱ्या व थंड जागी विश्रांती घेत असतात. त्यामुळे या आजारांमध्ये प्रामुख्याने हे डास मारण्यासाठी धूर फवारणी केली जाते या डासाची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा डास साचलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो. हा डास फुटकी टायर्स डबे बाटल्या इत्यादी घराच्या आजूबाजूला जे निरुपयोगी साहित्य असते त्यामध्ये पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या ठिकाणी अंडी घालत असतो. घरामधील फुलदाण्या, फ्रिज, कुलर यामध्ये त्याचे प्रजनन होत असते. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व पाणीसाठी झाकून ठेवणे व निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावणे.

हत्तीरोग :- हत्तीरोग हा विकसनशील देशांना अत्यंत भेडसावणारा असा हा आजार आहे. खरतर या आजाराची गणना ही NTD ( Neglected Tropical Disease) मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. खऱ्या अर्थाने हा दुर्लक्षित परंतु सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. या आजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पायाला येणारी सूज ही एकदा सुरु झाली थोड्याफार पद्धतीने नियंत्रित करता येते. परंतु एकदा हा आजार झाला तर तो मात्र शेवटपर्यंत बरा होत नाही. ते व्यंग घेऊन त्या व्यक्तीला जन्मभर रहावे लागते. हत्ती रोगाचा प्रसार हा कूलेक्स डासांच्या प्रजाती पासून होतो. हत्तीरोग हा कूलेक्स क्विंकीफिसीयाटुस या प्रजातीपासून होतो. या डासांचे प्रजनन हे घाणेरड्या तसेच प्रदूषित पाण्यामध्ये होत असते. गटारी, नाले, सेप्टिक टॅंक मध्ये अंडी घालत असतो. या आजारात गटारी वाहती करणे सेप्टिक टॅंक ला जाळ्या बसवणे, वेंट पाईपला जाळी बसवणे इत्यादी उपाय योजना केल्या जातात. या डासाची चावण्याची सवय ही संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांजेच्या वेळेला असते.

जपानी मेंदुज्वर :- हा आजार कूलेक्स विष्णूई या प्रजातीच्या डासांपासून होत असतो. हा डास प्रमुख्याने जिथे भात शेती किंवा पान वनस्पती आहेत अशा ठिकाणी प्रजनन करतो या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाला या आजाराची लागण ही अपघाताने होते परंतु या आजाराची तीव्रता लहान मुलांच्या मध्ये जास्त आहे. हे डास विश्रांतीसाठी घराच्या बाहेरच्या बाजूला झाडाझुडपा मध्ये विश्रांती घेतात त्यामुळे या आजारांमध्ये आपण घरा मध्ये तसेच घराबाहेर धूर फवारणी करत असतो.

आजारामुळे होणारे दुष्परिणाम
यामुळे बाधित लोकांची तसेच त्यामधील मृत्यूंची संख्या वाढते. औषधावरील खर्च वाढतो, मनुष्यबळाचा नाश होतो. देशाचे आर्थिक नुकसान होते, डासांच्या नायनाटासाठी किमती कीटकनाशकांचा वापर केला जातो याचा दुष्परिणाम मनुष्य तसेच इतर उपयोगी कीटकांवर होतो.

या डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात
या डासांना प्रतिबंध करण्यापूर्वी डासांचे जीवन चक्र समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक डास हा दर तीन दिवसांनी 150-200 अंडी घालत असतो. या अंड्यातून एक ते दोन दिवसात अळी तयार होते. या अळीच्या चार अवस्था झाल्यानंतर त्याचा कोष तयार होतो व या कोषातून संपूर्ण डास साधारणतः 8-12 दिवसांमध्ये तयार होत असतो. अंडी अळी कोष यांची वाढ ही पाण्यात होत असते. त्यामुळे ही वाढ पाण्यातच रोखणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण एकदा प्रौढ डास तयार झाल्यानंतर त्याला पकडणे किंवा त्याला मारणेसाठी खूप किमती कीटक नाशके वापरावी लागतात. त्यात ती दिलेल्या मात्रेत डासापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे तसे झाले नाही तर डासामध्ये प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यातील अळीला मारणे केंव्हाही सोपे. हे कमी खर्चिक आहे. त्यामुळे खालील सोप्या उपाय योजना अमलात आणल्यास निश्चितच या आजारांना प्रतिबंध करता येईल.

1.घरातील गावातील सर्व पाणी साठे वाजाते करावेत.
2.साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
3.जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस याअळीनाशकांचा वापर करावा.
4.गावांमध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा.
5.वेंट पाइपला जाळ्या बसवावेत.
6.गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा नायनाट केलेस 25 टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.
7.गटारी वाहती करावीत.
8.घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
9.रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा .
10.दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे.
11.संध्याकाळी घरामध्ये धूर करावा

जनतेसाठी आवाहन :- ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. घराच्या आजू बाजूला पाणी साठून देऊ नका. कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका…

लेखक – सत्यजीत टिप्रेसवार,- आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर जि. नांदेड. – ९४२३०३०९९६. satyajit996@gmail.com

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button