नांदेड| येथिल मुख्य डाक कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा केंद्रात नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी मोठी याचं येऊ लागली आहे. पासपोर्ट कायद्यानुसार भारतीय नागरिकांनी देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करून तशी कागदपत्रे दिली तरी आणखी अवाजवी पुरावा कागदपत्र मागवून जाणीवपूर्वक पासपोर्ट सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्तजीबुद्दीन मुनीरुद्दीन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांना पाठवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड येथिल मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये एप्रिल 2018 मध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी गेल्या 06 वर्षात सुमारे 50 हजार नागरिकांनी लाभ घेऊन त्यांचे पासपोर्ट बनवले आहेत. पासपोर्ट कायद्यानुसार भारतीय नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा कागदपत्र देणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या चौकशीनंतर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांशिवाय आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पासपोर्ट दिले जात होते.
परंतु मागील काही दिवसापासून नांदेड डाक विभागाकडून पोस्ट ऑफिस पासपोर्ट सुविधा केंद्रात अर्जदारांची जन्मतारीख व वास्तव्य पुरावा देऊनही नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. नवीन पासपोर्टसाठी जन्मतारीख व वास्तव्य असे दोन पुरावे आवश्यक असल्याचे पासपोर्ट सुविधा संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. तरीदेखील नांदेड शहरातील पोस्ट ऑफिस पासपोर्ट कार्यालयात नागरिकांना विनाकारण निवडणूक ओळखपत्र व इतर कागदपत्रे मागतली जात आहेत.
त्यामुळे नागरिकांना पासपोर्ट मिळवण्यापासून दूर ठेवले जात आहे कि काय अशी शंका समोर येऊ लागली आहे. अनेक वेळा नागरिकांना अवाजवी कागदपत्रांसाठी वेठीस धरले जात असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी येणारी अडचण दूर होईल अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्तजीबुद्दीन मुनीरुद्दीन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री यश जय शंकर यांना पाठवले आहे. या पात्राच्या प्रती संबंधित कार्यालयाला सुद्धा देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.