हिमायतनगर| बोरगडी महसूल सज्जातील तलाठी केशव थळंगे यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले प्रत्यक्ष नुकसान कमी दाखवून शासनाच्या उद्दिष्टांना धक्का दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांकडून तात्काळ पदभार काढून घेऊन नवीन महसूल अधिकारी म्हणून आंदेगाव येथील तलाठी संजय बिर्हाडे यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भात नांदेड न्यूज लाईव्हने व्रत्त प्रकाशित केले होते. यांची दाखल घेऊन हे आदेश काढले असून, चौकशी अंती पुढील कार्यवाही प्रस्तावित होईल असें तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी सांगितलं.


अतिवृष्टीत शंभर टक्के नुकसान, पण अहवालात फक्त 55-60 टक्क्यांचा उल्लेख
बोरगडी सज्जातील बोरगडी, कारला आणि सिबदरा गावातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. नाल्यालगतच्या शेतातील जमीन खरडून गेली असून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या होत्या. तहसीलदार, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी तलाठी थळंगे यांच्याकडे होती. मात्र, त्यांनी शासनादेश व वरिष्ठांचे आदेश धुडकावून फक्त 55 ते 60 टक्के नुकसान दाखवून अहवाल सादर केला.


शेतकऱ्यांच्या तक्रारी वं नांदेड न्यूज लाईव्हच्या व्रत्तानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई
या मनमानीविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाईव्हने प्रकाशित केल्यानंतर तहसीलदारांनी त्वरित हस्तक्षेप करून बोरगडी सज्जातील पदभार तलाठी थळंगे यांच्याकडून काढून घेतला. त्यांच्या जागी संजय बिर्हाडे (तलाठी, आंदेगाव) यांच्याकडे नवीन पदभार सोपविण्यात आला असून पुढील अहवाल व नुकसान भरपाईची प्रक्रिया त्यांच्यामार्फत होणार आहे.


निलंबनाचीही मागणी सुरू
शेतकऱ्यांच्या हिताला तडा जाऊन शासनावरील विश्वास कमी करणाऱ्या तलाठ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत. “नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांनी शेतकऱ्यांची साथ द्यायची तेच नुकसान करतात, हे असह्य आहे. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करा,” अशा स्वरात नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणात पुढील विभागीय कारवाई काय होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


