
नांदेड| २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड केंद्रातून टायनी एंजल्स स्कूल, नांदेड या संस्थेच्या ‘प्लॉट नं. शून्य’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेड संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाला द्वितीय, गोपाला फाऊंडेशन, परभणी संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाला तृतीय, तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मंठा संस्थेच्या ‘लपंडाव’ या नाटकाला चतुर्थ क्रमांक मिळाला. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निकालाची घोषणा केली. ही चारही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.


ता.२० ते ता.२९ जानेवारी या कालावधीत छत्रपती संभाजीनगरमधील तापडिया नाट्यमंदिर, बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि नांदेडमधील कुसुम नाट्यगृह येथे झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेत विविध गटांतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पारितोषिके देण्यात आली. दिग्दर्शन गटात दिनेश कवडे (‘प्लॉट नं. शून्य’) यांनी प्रथम पारितोषिक पटकावले, तर महेश घुंगरे (‘आभाळ’) यांना द्वितीय आणि आसमा अन्सारी (‘लपंडाव’) यांना तृतीय क्रमांक मिळाला. प्रकाशयोजनासाठी नारायण त्यारे (‘झाले मोकळे आभाळ’) यांना प्रथम, तर माणिकचंद थोरात (‘आभाळ’) यांना द्वितीय क्रमांक मिळाला. नेपथ्य गटात गौतम गायकवाड (‘प्लॉट नं. शून्य’) यांनी प्रथम आणि सम्म्राट डोईबळे (‘आभाळ’) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

रंगभूषा गटात आस्मिता साबळे (‘एलियन्स द ग्रेट’) यांनी प्रथम तर नितीश देशपांडे (‘अरे माणसा, माणसा’) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक साई पतंगे (‘प्लॉट नं. शून्य’) आणि नम्रता वाघ (‘झाले मोकळे आभाळ’) यांना देण्यात आले. तसेच श्रावणी घायट (‘मॅडम’), संस्कृती पुजारी (‘हामुरा’), ओवी काजे (‘कस्तुरी’), माया राठोड (‘लपंडाव’), इश्वरी रुपनर (‘ये रे ये रे पावसा’), राजवीर शिंदे (‘एलियन्स द ग्रेट’), गोविंद नरवडे (‘जिर्णोद्धार’), कन्हैया जाधव (‘सावली’), स्वराज कराळे (‘आभाळ’), परीक्षित पांचाळ (‘एलियन्स द ग्रेट’) या कलाकारांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास धुमाळ, प्राची गोडबोले आणि नरेंद्र आंगणे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत भविष्यातही उत्तम कामगिरी करण्याची शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे समन्वयक म्हणून किरण चौधरी यांनी काम पाहिले.





