Wednesday, May 13

अथलेटिक्स व कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड; पात्र खेळाडूंना अर्जाचे आवाहन

नांदेड| राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागात अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रासाठी अथलेटिक्स व कुस्ती या खेळांमध्ये प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवर शुक्रवार, 20 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले आहे.

पात्रता व आवश्यक कागदपत्रे : या निवडीसाठी अर्ज करणाऱ्या खेळाडूंचे वय 31 डिसेंबर 2026 रोजी 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट साईज फोटो, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक असून राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्तरावर (SGFI, AFI, Khelo India National) सहभागी झालेल्या खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. अंतिम निवड क्रीडा कौशल्य, तंदुरुस्ती चाचण्या व मागील कामगिरीच्या आधारे केली जाईल. तसेच शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा : निवड झालेल्या खेळाडूंना निवासी क्रीडा प्रशिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, क्रीडा साहित्य, स्पर्धांचे आयोजन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची मदत, करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय निवास, भोजन, पूरक आहार, वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण व स्पर्धा सहभागाचा खर्च शासनामार्फत उचलला जाणार आहे.

‘मिशन लक्षवेध’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पात्र खेळाडूंनी अर्ज करावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभाग, लातूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!