hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातील विविध वीज समस्यांबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने शुक्रवारी लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मीराशे यांनी आपले आमरण उपोषण दिनांक 13 शुक्रवारी मागे घेतले.

हिमायतनगर येथील महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर ९ मार्च २०२६ पासून विविध मागण्यांसाठी वामनराव पाटील मीराशे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत १२ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता व स्थानिक अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरात आरडीएसएस (RDSS) योजनेअंतर्गत काही कामे सुरू असून काही विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शहरातील काही भागांमध्ये नवीन एचव्हीडीएस (HVDS) रोहित्र बसविणे, खराब वीज लाईनची दुरुस्ती तसेच धोकादायक वीज वाहिन्यांचे स्थलांतर अशी विविध कामे नियमानुसार करण्यात येणार आहेत.

यामध्ये स्मशानभूमी परिसरातील वीज वाहिनीचे स्थलांतर, देखभाल व दुरुस्तीची कामे, शहरातील काही ठिकाणच्या डीपीचे स्थलांतर, धार्मिक स्थळांजवळील वीज व्यवस्थेची दुरुस्ती तसेच ११ केव्ही वीज लाईनचे पुनर्स्थापन अशी अनेक कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे महावितरणचे भोकर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता त्रिवेदी यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून आवश्यक असल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पाचव्या दिवशी वामनराव पाटील मीराशे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, नगरसेवक सरदार खान, माजी सभापती गजानन तुपतेवार, बाळू अण्णा चवरे, संदीप अग्रवाल, सदाशिव सातव, रामभाऊ सूर्यवंशी, श्याम ढगे, राजदत्त सूर्यवंशी, मुन्नाभाऊ शिंदे, बालाजी ढोणे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

“हिमायतनगर शहरातील वीज समस्यांबाबत वामनराव पाटील मीराशे यांनी सुरू केलेले उपोषण हे पूर्णपणे जनहितार्थ होते. नागरिकांच्या अडचणींची जाणीव ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असून, शहरातील नागरिकांनीही आमच्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना कामे सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.” असे आवाहन भोकर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता त्रिवेदी यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button