Demands ; आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची गुरु रविदास समता परिषदेची मागणी

नांदेड| नांदेड येथील भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि रामतीर्थ पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले असून तात्काळ कारवाई नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

भाग्यनगर पोलीस स्टेशन अंतर्गत तुळशीराम नगर नांदेड येथे विवाहित युवती प्रियंका अभिजित अन्नपुरे (वय ३२) हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून यातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सुरुवातीपासून भाग्यनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. यातील एक आरोपी अटकेत आहे, दोघांची जमानत झाली तर एक आरोपी मागील दोन महिन्यांपासून फरार आहे. त्याचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला तरी त्यास अटक करण्यास पोलीस टाळत आहेत.

याबाबत पोलीस अधीक्षक यांना अनेकदा निवेदने देऊनही कांही फरक पडत नाही. या प्रकरणी तपास उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीस अटक करण्यास टाळण्यात येत असल्याने तपास योग्य दिशेने होईल की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्या तपासिक अधिकाऱ्याची बदली झाली असून दुसऱ्या तपासिक अधिकाऱ्याने अजून तपास सुरु केल्याचे दिसून येत नाही.

पोस्को प्रकरणी अटक नाही !
नरसी येथे चांभार जातीच्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या मुस्लीम युवकाने आपल्या कुटुंबियांसह मुलीच्या घरावर सामुहिक हल्ला केला असून याबद्दल बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल क्रमांक ६६ दि. ०१/०३/२०२५ पोस्को व अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला परंतु एक महिना होत आला तरी अजून सर्व आरोपींना अटक करण्यास पोलीस उपअधीक्षक बिलोली हे मुद्दाम टाळाटाळ करीत आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी फिर्याद दाखल करुन घेण्यास विलंब लावला व फिर्यादीलाच धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वाशीम जिल्ह्य़ातील बाभुळगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा अनिकेत संतोष सादुडे याचे अपहरण करुन साठ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच खंडणीखोरांनी अपह्रत युवकाचा खून केला. यातील दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली.

या निवेदनावर समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, श्रीमती गंगासागर कमलेश्वर, अन्याय प्रतिकार परिषदेचे अध्यक्ष उत्तम गायकवाड, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, युवक अध्यक्ष राहुल गोरे, अक्षय गायकवाड, पत्रकार लक्ष्मीकांत दुधकवडे, काॅ. गंगाधर गायकवाड, सुरेश वाघमारे यांच्या सह्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button