मुखेड/मुक्रामाबाद, बस्वराज वंटगिरे| तालुक्यातील मौजे देगाव येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे देगाव तालुका मुखेड जि. नांदेड येथे 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे श्रमसंस्कार विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे देगाव येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब (सचिव अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ) हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून भालचंद्र तिडके साहेब (स.पोलीस निरीक्षक-पो.स्टे. मुक्रमाबाद) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मुकुंदराज जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. रेखाबाई फुलेवाड (सरपंच देगाव) नागनाथ याचावाड (उपसरपंच), सौ नयन पोटे मॅडम (ग्रामसेवक),जी डी जाधव (मुख्याध्यापक), कल्याण जुबरे, प्रकाश याचावाड, मारुती पाटील, सूर्यकांत रोठेवाड हे उपस्थित होते.

उद्घाटन पर भाषण करताना भालचंद्र तिडके साहेबांनी या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. याबरोबरच या गावातील स्वच्छता करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. याविषयीची माहिती गावकऱ्यांना द्यावी. याबरोबरच व्यसनमुक्तीचे महत्त्व यासाठीचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी मनापासून गावामध्ये करावे. असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना-“विद्यार्थ्यांनी जगताना सकारात्मक विचार करून जगणे गरजेचे आहे.

व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान अंतर्गत वेगवेगळे कामे करणे व गावातील स्वच्छता वाढवण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे”असा विचार मांडला. स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ विवेक इनामदार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. तर प्रास्ताविक भाषणामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. मा.म. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सात दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला कोणकोणते कामे करावयाचे आहेत त्या संबंधित माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी.पी. खराबे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा डॉ आर बी मादळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
