हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी १९.१९ कोटी रुपयाच्या मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील ३० हजार लोकसंख्येला दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असून, परिणामी आता पाणी त्यांचॆची भीषणता वाढत आहे. तात्काळ हि योजना सुरु नाही केल्यास दिनांक २० पासून नागरिक बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. असा इशारा आज संबंधितांना निवेदन देऊन दिला आहे.


हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक ०२/०७/२०१९ पासून सुरु झाले. शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नगरपंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून १९.१९ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला होता. नळयोजनेचे काम गुत्तेदाराने २४ महिन्याच्या आत पूर्ण करण्याची हमी, अटी व शर्तीवर करारनामा केला होता. मात्र जवळपास ६ वर्षाचा काळ संपत आला असून, पाणीपुरवठा योजनेचे काम आजपर्यंत १००% पूर्ण झाले नाही. परिणामी हिमायतनगर शहरातील जनतेचे पिण्याच्या व इतर वापराच्या पाण्याची दुर्दशा कायम आहे. याला जबाबदार कोण…? असा प्रश्न शहरवासीयांनी उपस्थित केला असून, सदरचे काम करणाऱ्या ठेकेदार में. एम.टी.फड यांनी वेळेत पूर्ण केले नाही. म्हणून दंड का आकारण्यात येऊ नये…” अशी शंका उपस्थित केली आहे.

हिमायतनगर शहरच्या पाणीपुरवठा कामाबाबत गेल्या वर्षी दिनांक ०२ में २०२४ रोजी नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तेव्हा नगरपंचायत कार्यालयाने दिनांक १७ में २०२४ रोजी पत्राद्वारे शे. हनीफ शे. बाबू यांना नळयोजना १००% पूर्णत्वास जात असल्याचे नियोजित केल्याचे पत्र दिले, मात्र अद्यापपर्यंत हि नळयोजना कार्यान्वित झाली नाही. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही आणि नळयोजना कामावर नियंत्रण नाही. दिलेल्या पत्रास ९ महिने पूर्ण झाले तरीही शहरात पाण्याचा थेंब सुद्धा आलेला नाही. आज पर्यंत नगरपंचायत हिमायतनगर जि. नांदेड, ह्यांच्याकडून सदरील गुत्तेदारास कामाचे बिल १५.२८ कोटी रुपये इतका निधी देऊन टाकला आहे. मात्र काम अद्यापपर्यंत अर्धवट स्वरूपाचे आहे.

हिमायतनगर शहरातील नागरिकांना मागील २५ ते ४० वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत शहरवासीयांना पाणी पुरवठा सुरु न केल्यास दिनांक २५ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास करणार आहोत. असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति पाणीपुरवठा मंत्री, तथा नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, आयुक्त तथा संचालक, नगरपंचायत प्रशासन, संचालनालय, बेलापूर – मुंबई, जिल्हाधिकारी, नांदेड, खासदार नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली, आमदार बाबुराव कदम, हदगाव- हिमायतनगर विधानसभा, हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दिले आहे. या निवेदनावर जफर मोहम्मद खान नजर मोहम्मद खान, बाबाराव संभाजी शिंदे, शेख हनीफ शेख बाबू, कॉमरेड दिगांबर काळे आणि सर्व हिमायतनगर यांच्या स्वाक्षरी आहेत.
