नांदेड l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत दिनांक ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिनानिमित्त संस्थेत राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या हस्ते स्वराज्याचे प्रतीक असलेल्या स्वराज्यगुढी उभारणीने झाली. यावेळी १५ फूट उंचीची स्वराज्यगुढी अष्टगंध, अक्षता, पुष्पहार व आंब्याच्या पानांनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी “राष्ट्रगीत” आणि “महाराष्ट्र गीत” सामूहिकरित्या गायले.



या प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. संजय देठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अनिल गोंडे, प्रबंधक डॉ. अरुण पाटील, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. ए. व्ही. नांदेडकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली. “६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नव्हता, तर स्वराज्याच्या मूल्यांची स्थापना करणारा महत्त्वपूर्ण टप्पा होता. हा दिवस आपल्याला एकता, शौर्य, देशभक्ती व जनकल्याण यांचा वारसा जपण्याची प्रेरणा देतो,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग व साईट विभागातील कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.



