नांदेड| जिल्ह्यातील नायगांव (खै.) तालुक्यातील बहुचर्चित मेळगांव येथिल गोदापात्रातून गत काही दिवसापासून राजरोसपणे रेतीउपसा व वहातूक करण्यात येत असून संक्शन पंप व बोटीचा वापर करित राजाश्रय असलेली स्थानिकची काही व्हाॅईट काॅलर मंडळीच स्वतः रेतीतस्कर बनल्याने सोबतच, संगनमतातून आर्थिक हित असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाकडून डोळेझाकपणा करण्यात येत असल्याची संतप्त भावना जनतेतून चर्चित आहे.
सविस्तर वृत्त असे की, नायगांव तालुक्यातील एकेकाळी स्वच्छतेत पुरस्कारप्राप्त असलेले मेळगांव गत काही वर्षात विविध बाबींनी बहुचर्चित बनलेले असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा व प्रशासनातील कांही वरिष्ठांचा राजाश्रय असलेली येथिल ‘निवडक’ व्हाॅईट काॅलर मंडळी स्वतःच्या आर्थिक हितासाठी विविध उपक्रमांतून सरस ठरलेली असल्यानेच सद्या ते या गांवासह बहुचर्चित ठरत आहेत. त्याचाच प्रत्यय पून्हा एकदा या ठिकाणी गत काही दिवसात सुरु झालेल्या राजरोसपणे रेती उत्खनन व वहातूकीतून आला आहे.
गोदावरी लगतचे व रेतीघाट असलेले गांव असलेल्या मेळगांव ग्रामपंचायतीला महसूल विभागाकडून मिळत असलेल्या निधीतून असो वा शासनांच्या विविध योजनांतून मंजूर कामाच्या निधीतून स्वतःचा विकास साधतांनाच येथिल सदरिल मंडळीनी एकत्र येत नामी शक्कल लढवून गत काही दिवसापूर्वीच संक्शनपंप, बोटींची खरेदी करुन ती येथिल गोदापात्रात ठेवली आहे.तत्पूर्वी या पात्रालगत दळणवळणाला रस्ता निर्मितीसह त्याची दुरुस्ती करुन काही प्रमाणात मजबुतीकरण केलेले आहे.
त्या माध्यमातूनच रेती उपसा व वहातूक केली जात आहे. याबाबतची माहिती मिळताच आमच्या प्रतिनिधीने स्थळ पहाणी केली असता त्यात सत्यता दिसून आली.या ठिकाणच्या गोदापात्रात संक्शनपंप असलेली बोट तसेच, गोदापात्रालगत ते थेट रस्यापर्यंतच्या रस्त्याची निर्मितीही झाल्याचे आढळले. अधिक माहिती घेतल्यानंतर रेती उपसा व वहातूक जनतेत चर्चा होत असल्याने दिवसा थांबविण्यात आली असून रोजच रात्री-अपरात्री उशिरापर्यंत करण्यात येत असल्याचे समजले.
दरम्यान रेती उपसा,वहातूक असो वा मुरुम,माती,दगड आदी गौण खनिजांचे मर्यादा वा परवानगीपेक्षा जास्तीचे व अवैद्ध उत्खनन व वहातूक नायगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असतांनाही या प्रकरणात तालुक्यातील महसूलसह पोलीस प्रशासनातील स्थानिक दूरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दूर्लक्ष होत असल्यानेच मेळगावसह अन्य ठिकाणीही राजरोसपणे हा प्रकार संगनमतातून आर्थिक हितासाठी सुरु असल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या भूमिकेवर लक्ष !
महत्वाचे म्हणजे, कर्तव्यदक्ष,कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडेच जिल्हाभरातील गौण खनिज विभाग हा जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर आल्याने आगामी काळात अवैद्ध गौण खनिज उत्खनन व वहातूकीवर निर्बंध येण्याची शक्यता असली तरिही यापूर्विच्या किमान वर्षभरातील गौण खनिज उत्खनन,वहातूक याबाबतची मान्यता व सद्यस्थिती व मेळगांवसह जिल्हाभरातील राजरोसपणे सुरु असलेल्या विनापरवाना रेती उत्खनन,वहातूकीवर त्यांच्याकडून कारवाईची शक्यता असून त्यांच्या भूमिकेवर जनतेचे लक्ष लागून आहे.