Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल
शेतकऱ्यांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान
नांदेड /अर्धापूर | नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मौजे पार्डी (म) येथे अज्ञात माथेफिरूंच्या टोळीने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


दिनांक १२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पाच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेत घुसून तब्बल ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल केली. तसेच ठिबक सिंचन आणि सबलाईनच्या पाईपांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत शेतकरी साईनाथ मारोतराव हापगुंडे (गट क्र. १७९), प्रसाद साहेबराव हापगुंडे (गट क्र. १७९), नवनाथ दतराव हापगुंडे (गट क्र. १२), प्रफुल्ल बाबूराव देशमुख आणि रविकुमार हरीआप्पा पत्रे यांच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ झाडांची कत्तलच नव्हे तर ठिबक सिंचनासाठी वापरले जाणारे काळे पाईप, तुषार सिंचन पाईप आणि सबलाईन पाईपही जागोजागी कापून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे उभ्या असलेल्या सुमारे १० हजार केळीच्या झाडांवरही उन्हामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



या घटनेमुळे संबंधित शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उध्वस्त झाले असून कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. दिवसभर शेतात उभ्या असलेल्या उद्ध्वस्त केळीच्या बागांकडे पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावल्याचे चित्र होते.

अर्धांपूर तालुक्यातील मौजे पार्डी परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. यामध्ये सोयाबीनचे ढिग जाळणे, टिश्यू केळीचे कंद उपटणे, केळी व पपईची झाडे कापणे, वाहनांच्या काचा फोडणे, शेतातील पत्रे चोरीला जाणे तसेच विद्युत वायर चोरीसारख्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रूपेशकुमार नरवाडे व संभाजी शिवभक्त पुढील तपास करत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच निळकंठराव मदने यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला आहे.



