हिमायतनगर (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यानंतर हिमायतनगर (वाढोणा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.


येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवानी एकत्र येऊन गुलालाची उधळण करा जेसीबीवर चढून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तैलचित्र हातात घेऊन ठेका धरला. यावेळी एक मराठा लाख मराठा असं जयघोष करत फटाके फोडून, जल्लोष करण्यात आला. परस्परांना गोडधोड वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



मराठा आरक्षणाच्या या ऐतिहासिक निर्णयामागे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेले आमरण उपोषण निर्णायक ठरले. तसेच समितीतील सर्व मंत्रीमंडळ, राज्य शासन, आणि या चळवळीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणारे सर्व समाजबांधव यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या आनंद सोहळ्यात गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.




