petrol pumps : लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी

लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. रामनवमीच्या दिवशी दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा, जीप आदी वाहनांनी इंधन भरण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर गर्दी केली होती.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी पॅनिक खरेदी करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तरीही इंधन तुटवड्याची भीती वाहनधारकांमध्ये दिसून येत असून “टँक फुल” करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र होते.

दरम्यान, जानापुरी येथेही गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. गॅस गोडाऊनसमोर नागरिकांनी उन्हातान्हात रांगा लावल्या. प्रत्यक्षात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून, नोंदणीनंतर नियमानुसार सिलेंडर वितरण होत असल्याची माहिती संबंधित एजन्सीकडून देण्यात आली. राजश्री मनोहर पाटील भोसीकर यांच्या एजन्सीमार्फत वितरण पूर्ववत सुरू असून व्यवस्थापक वैजनाथ भोसीकर ग्राहकांच्या अडचणी सोडवत आहेत. शहरात गॅस टंचाईची कोणतीही स्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.



अफवांवर विश्वास ठेवू नका – आ. चिखलीकर
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही नागरिकांना आवाहन करत, जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून अफवांमुळे अनावश्यक गर्दी होत आहे, असे सांगितले. लोहा शहरासह नांदेड रोडवरील पेट्रोलपंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे त्यांनी नमूद केले.

चौकट : गॅस व इंधन तुटवडा नाही – तहसीलदार परळीकर
लोहा तालुक्यात गॅस व इंधनाचा पुरवठा नियमित सुरू आहे. गॅस सिलेंडर नोंदणीनुसार वेळेत दिला जातो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.



