
हिमायतनगर| शहर व परिसरात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार ऐन सणासुदीच्या काळात समोर येऊ लागला आहे. सण उत्सवाच्या काळातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने गणेश भक्तांसह माता गौरीच्या उत्सवात अडथळे निर्माण झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर पुढील दिवसात हा प्रकार थांबला नाहीतर संतप्त गणेशभक्त महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.


गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ऐन मुख्य आरती पूजेच्या वेळेला वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गणेश भक्त व गौरीपूजनाच्या तयारीत असलेल्या महिला वर्गातून महावितरण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या ०७ तारखेला गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी रात्रीला आठ ते १० च्या दरम्यान गणरायाची भाविक भक्ताकडून आरती, महापूजा आणी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.


उत्सवाचा आनंदाच्या पर्वाला सुरु होण्याच्या वेळेला वीजपुरवठा खंडित होऊ लागली आहे.गेल्या दोन दिवसापासून तर तासंतास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरझन पडलं आहे. त्यातच माता गौराईचे आगमन झालेले असताना देखील महावितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित करून उत्सवामध्ये विरझन टाकले जात असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. हिमायतनगर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या संदर्भात तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस अधिकारी अमोल भगत यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळी महावितरणचे अधिकाऱ्यांना गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या.



त्यानंतर देखील उत्सवाची रेलचेल रंगात आली असताना रात्रीच्या वेळेला वीजपुरवठा खंडित होत असल्याने महापूजा आरतीच्या कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. गणेशोत्सव आणखी चार दिवस बाकी आहेत, आगामी पुढील दिवसात तरी वीज पुरवठा खंडित करून गणेशभक्तांची नाराजी महावितरण कंपनीने ओढवून घेऊ नये अशी मागणी केली जात आहे. अन्यथा महावितरणच्या कारभाराच्या विरोधात संतप्त गणेश भक्त महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. मग होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महावितरण विभागाची राहील असेही काही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले आहे.




