उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील येळी येथील रेतीघाटावरून रेतीचा विनापरवाना उपसा करून अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी वाहनांसह ताब्यात घेतले असून उस्माननगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हा शाखा, नांदेडचे पथक २१ जानेवारी रोजी रात्री गस्तीवर असताना वाका फाटा येथे आले होते. त्यावेळी त्यांना येळी फाटा रस्त्यावर रेतीची टिप्परद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमी दारांमार्फत मिळाली. त्यावरून पोलिसांनी पाहणी सुरू केली असता मारतळा ते कहाळा रोडवर टाटा कंपनीचे दोन टिप्पर क्रमांक एमएच २२ एए ३६६६ व एमएच २६ बीई १५५२ पोलिसांना अवैध वाहतूक करताना आढळले.

या वाहनांवर चालक म्हणून असलेले परमेश्वर हनमंत पवार (२४) रा. हंगरगा ता. उमरी व नागोराव धोंडिबा गाढे (३०) रा. बळेगाव ता. उमरी या दोघांना वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. गौणखनिजाची अवैध व रॉयल्टीशिवाय वाहतूक केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन टिप्परची किंमत अंदाजे ८ लाख रू.व त्यामध्ये प्रत्येकी ३-३ ब्रास असलेली रेती, तिची किंमत अंदाजे ३० हजार असा एकूण ८ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, विश्वनाथ देवीदास पवार, मारोती मोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पोलिसांच्या दक्षतेमुळे अवैध वाहतूक करणाऱ्या या दोन वाहनांना ताब्यात घेण्यात आले असले तरी अनेकवेळा रेतीचा विनापरवाना उपसा व अवैध वाहतूक करण्याचे अनेक प्रकार अंधाऱ्या रात्री घडत असतात. त्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.