उस्माननगर, माणिक भिसे। महावितरण च्या रोहित्रामधून (डीपी) ऑईल चोरणारी टोळी उस्माननगर पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

उस्माननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार व त्यांचे पथक २३ जानेवारी रोजी रात्री गोळेगाव ते शिराढोण मार्गावर पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, रोहित्रामधील ऑईल चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे असलेले सय्यद हुसेन सय्यद सलीम रा. वाजेगाव, शेख नशीब शेख इब्राहीम रा. देगलुर नाका, सय्यद रज्जाक सय्यद हुसेन रा. वाजेगाव व लालू उर्फ राहुल गायकवाड रा. चौफाळा या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक पाईप, लोखंडी पाईप, दोन लोखंडी चैन पाने, पाच रिकामे कॅन, एक ऑटो असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पथकात हवालदार राम टेकाळे, सुशील कुबडे, नामदेव रेजितवाड, अनिरुध्द वाडे, अप्पाराव यांचा समावेश होता. पथकाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी कौतुक केले.
