किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुका हा अतिदुर्गम भाग असल्याकारणाने अनेक बोगस डॉक्टरांनी (Action against bogus doctors) वाडी तांड्यामध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असून भोळ्या भाबड्या गोरगरीब आदिवासी बहुल असलेल्या भागामधून ही बोगस डॉक्टर मंडळी मोठ्या प्रमाणात जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची विदारक चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच गेल्या सात ते आठ वर्षापासून दहा हजार लोकसंख्या असलेल्या इस्लापूर शहरांमध्ये एका बोगस डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस मोठ्या जोमाने थाटली होती.

याप्रकरणी किनवट तालुक्यातील इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एक बोगस मुन्नाभाई वैद्यकीय व्यवसाय करत असल्या बाबतची तक्रार मा. डॉक्टर डी. यु .वांगे प्रबंधक महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नरिमन पॉईंट मुंबई ट्वेंटी यांच्या कार्यालयात प्राप्त झाली. या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 2 जानेवारी 2025 च्या पत्राअन्वये सदर बोगस डॉक्टर रासरोसपणे प्रॅक्टिस करून समाजाच्या आरोग्याची व्यवस्था बिघडण्याचे काम करीत असल्याबाबतचे पत्रात नमूद करण्यात आले असून संबंधित ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलीस पथकासह पाहाणी करावी व या बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करावा अशा स्वरूपाची सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी किनवट गटविकास अधिकारी यांना दिले.

केलेल्या कार्यवाही संदर्भात चा अहवाल तीन दिवसात कार्यालयास सादर करण्याचा आदेश पारित करण्यात आला. याप्रकरणी किनवट येथील तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड, विस्तार अधिकारी ए एन अनेलवार, शंकर गर्दसवार ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पथकाने सदरील बोगस डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिस करत असल्याच्या ठिकाणाची दिनांक 23 जानेवारी रोजी जाऊन पाहणी केली व घटनास्थळी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चक्क सदरील बोगस डॉक्टरांनी पथक येण्याच्या सात ते आठ दिवस अगोदरच दुकानाला कुलूप लावून पोबारा केल्याची माहिती प्राप्त झाली. व सदरील दवाखाना असल्याचे नाम फलक सुद्धा पांढऱ्या पेंटने पुसून टाकण्यात आले असल्याची धक्कादायक बाब या पथकासमोर आली असून या चौकशीसाठी आलेल्या पथका कडून आजूबाजूच्या दुकानदारास विचारणा करण्यात आली.

हे पथक इस्लापुरात दाखल होताच परिसरातील अनेक बोगस डॉक्टर मंडळी आपल्या प्रतिष्ठानला कुलूप लावून भूमिगत झाल्याची विदारक चित्र अप्पाराव पेठ, शिवनी, बोधडी परिसरात पाहायला मिळाली. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मात्र एकच खळबळ उडाली. असून तांड्या वाड्या व ग्रामीण भागामध्ये अजून किती मुन्नाभाई जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत त्यांच्यावर आरोग्य विभाग कारवाई करेल काय? याकडे किनवट भागातील जनतेचे लक्ष लागले आहे. सदरील इस्लापूर येथील बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्याने अनेक मुन्नाभाई चे धाबे दणाणले आहेत.
