नांदेड| पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते संदेश भंडारे यांचे मी ‘वारी’ आणि ‘तमाशा’ ही दोन्हीही छायाचित्र संग्रह पुस्तके पाहिली आणि वाचली आहेत. विद्यापीठातील या छायाचित्राच्या प्रदर्शनाद्वारे भंडारे यांनी आज जिवंत ‘वारी’ घडविली आहे. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. १ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी-आनंदयात्रा’ या पोस्टर प्रदर्शनाचा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रा. डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, प्रा. डॉ. शैलजा वाडीकर, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. डॉ. योगिनी सातारकर, प्रा. डॉ. नीना गोगटे, प्रा. डॉ. सुहास पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे कुलगुरू म्हणाले, या फोटो प्रदर्शनाद्वारे ‘वारी’ चे नियोजन, वारीची परंपरा, सहभागी वारकऱ्यांची पांडुरंगाप्रती भाव अशा सर्वच बाजूने या प्रदर्शनामध्ये हुबेहूब ‘वारी’ दिसते. ‘वारी’ शिवाय संदेश भंडारे यांचे ‘तमाशा’, ‘महाराष्ट्र राज्य’, ‘पुणे शहर’ या विषयावरती उत्कृष्ट दर्जाचे छायाचित्रण संग्रह पुस्तकी रूपाने प्रसिद्ध केले आहे. नव्या पिढीसाठी हे निश्चितच प्रेरणादायी आहे.