नांदेड| विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होईल, याचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.
नववर्षानिमित्त नांदेड येथील स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार जुनियर कॉलेज येथे आज बुधवार दिनांक १ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गजानन पांपटवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्रसिंह चंदेल, गणेश पाटील तिडके, संस्थेच्या सचिव अंजली पांपटवार यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, परिश्रमाने माणूस यशस्वी बनतो, ही महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाने संकल्प करावा की, आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करावी. आपले तसेच आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत. आयुष्यात सन्मानाने व स्वाभिमानाने जगायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असेही डॉ. राम वाघमारे म्हणाले.
यावेळी त्यांनी प्रेम कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसवत खेळवत प्रेरणा दिली तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेच्या विविध उपक्रमाचे व सृजनशील संस्थाचालकांचे डॉ. राम वाघमारे यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. गायकवाड यांनी मानले.