हिमायतनगर, अनिल मादासवार| धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात १५ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता हिमायतनगर तालुक्यातील कृषी विभागाच्या कामकाजावरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी हिमायतनगर कृषी विभागातील योजनांची, निविदांची, अनुदान वितरणाची आणि शेतकरी प्रशिक्षणाच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.


वडगावकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नावावर विविध माध्यमातून येणाऱ्या निधीचा गैरवापर झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “धाराशिवमध्ये चौकशी होऊन कारवाई होऊ शकते, तर हिमायतनगरमध्ये निष्पक्ष चौकशी का होऊ नये?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी विभागातील विविध योजना, निविदा प्रक्रिया, शेतकरी प्रशिक्षण, मार्गदर्शन, अनुदान आणि निविष्ठा वितरणात अनियमितता झाल्याचा संशय असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.


दोषी अधिकारी कोणत्याही पदावरील असो, त्यांच्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, हिमायतनगर कृषी विभागातील गैरव्यवहाराचे आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केले असून, या आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.




