नांदेड, प्रतिनिधी| मुंबई–नांदेड–मुंबई मार्गावरील विस्कळीत विमानसेवा नियमित करण्याची मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी संसदेत भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.


सध्या या मार्गावर आठवड्यातून केवळ दोन दिवसच विमानसेवा उपलब्ध असून, गेल्या तीन आठवड्यांपासून अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे आर्थिक नुकसानासह प्रवासाचे नियोजनही विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


नांदेड हे ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक व प्रवासी येथे येत असतात. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या मार्गावर एअर इंडिया किंवा इंडिगोसारख्या विमान कंपन्यांमार्फत बोईंग किंवा एअरबससारखी मोठ्या क्षमतेची विमाने दररोज सुरू करण्यात यावीत, अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.



तसेच मुंबई–नांदेड विमानसेवेचा प्रादेशिक संपर्क (UDAN) योजनेत समावेश करून सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी आणि नियमित विमानसेवा उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

