नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या वार्षिक क्रीडा महोत्सव झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. एकूण 900 स्पर्धकांनी (पुरुष व महिला) नोंदणी केली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सहभागींचे वय 6 ते 75 वर्षांदरम्यान होते, त्यामुळे सर्व स्तरांतून या स्पर्धेचे कौतुक करण्यात आले.

स्पर्धेचा शुभारंभ 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता झुडिओ, तिरंगा चौक, वझिराबाद येथून करण्यात आला. ओम गार्डन, लुटे मामा चौक, रोहित कॉर्नर, भगतसिंग चौक मार्गे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेसाठी अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती.

मार्गावर विविध ठिकाणी पाणी आणि वैद्यकीय मदत व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून स्पर्धकांना कोणत्याही अडचणी शिवाय मॅरेथॉन पूर्ण करता येईल. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नांदेड, हिंगोली, परभणी, नागपूर ,बीड येथील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

लहान मुले, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जोशात धाव घेतली आणि “फिट इंडिया, हेल्दी इंडिया” चा संदेश दिला. काही अनुभवी धावपटूंनी उत्कृष्ट वेळेत स्पर्धा पूर्ण करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. पुरुष गटांतील प्रथम- पियुष मसाने ,नागपूर ,द्वितीय – भावेश खंडार,नागपूर,तृतीय – शुभम तावडे, नांदेड, महिला गटांतील प्रथम- अंजली मडावी,नागपूर,द्वितीय – वर्षा कदम,परभणी),तृतीय – सानेश्वरी गुजर ,बीड विजेत्यांना विशेष सन्मान देण्यात आला.

तसेच,सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. ही स्पर्धा केवळ विजयाचा आनंद देणारी नव्हती, तर सर्व सहभागींच्या प्रयत्नांचा गौरव करणारा उपक्रम ठरला.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी अधिष्ठाता प्रा.संजय देठे, झेनिथ समन्वयक डॉ.अंकुश सावरकर, डॉ.जीत पाटील,विभाग प्रमुख डॉ.पी.जी.जाधव ,डॉ.गणेश पाकळे, डॉ.बी.एस.शेट्टी ,क्रीडा विभाग प्रभारी भास्कर कदम,विद्यार्थी समन्वयक उधेहन सोनवणे,यांची उपस्थिती होती.
संस्थेच्या संचालकांनी विजेत्यांचे आणि सर्व सहभागींचे अभिनंदन करून स्पर्धक, संयोजक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि आयोजकांचे आभार मानले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे संस्थेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक वातावरणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झेनिथ 2025 अंतर्गत आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये क्रीडा व फिटनेसची आवड वाढवण्यास मोठी मदत करणारी ठरली.