नांदेड l देशातील अनेक मागास समाजापैकी एक पण स्वाभिमानी असलेली आदिवासी जमात भलेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनंतरही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल परंतु सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या मजबूत आहे.

आदिवासी समाजात आजही मातृसत्ताक संस्कृती असून एकूण लिंग गुणोत्तराचा विचार करता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. याच समाजातील महिला माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई यांचा वारसा जपत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून ३०० च्यावर महिलांना पुस्तकांचे वाण देणार आहेत. याप्रसंगी समाजातील प्रतिष्ठित महिलांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

शहरातील मालेगाव रोडवरील रेड्डी गार्डनमध्ये ३ फेब्रुवारी रोजी आंध आदिवासी महिला मेळावा,हळदी कुंकू व स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी महिलांचे नृत्य,गायन, मूक अभिनय, भजन, खेळ व वक्तृत्व अशी अनेक कला गुणदर्शन, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

त्याच ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतरही अनेक वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉलही लावण्यात येणार असून ३०० आदिवासी महिला मेळाव्यात सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही विविध वस्तूंची विक्री होणार असून ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन आंध आदिवासी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
