श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील मलकागुडा येथील शेतकरी व उद्योजक नितीन पाटील कन्नलवार यांच्या शेतावरील १० एकर पैकी तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून राख झाले आहे.सदरील घटनेमुळे शेतकर्यासह अनेकांनी हळहळ व्यक्त करीत महावितरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

माहूर तालुक्यातील महावितरणचे विद्युत पुरवठा जाळे पूर्णतः जीर्ण अवस्थेत आले असून त्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.परंतु महावितरण कंपनीला विद्युत खांबावरील जीर्ण अवस्थेत आलेले तार बदलण्याची गरज वाटत नाही,ते नवलच म्हणावं लागेल, नितीन पाटील कन्नलवार यांच्या दहा एकर शेतावर उभा असलेल्या हिरव्या गार ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून राख झाले.

लागलेल्या आगीची वार्ता मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे,सामाजिक कार्यकर्ते अमजद खानयांचेसह अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.कन्नलवार यांचे शेत मलकागुडा आणि वाई बाजार या दोन गावाच्या मध्य भागी आहे.ऊसाला लागलेल्या आगीमुळे दोन्ही कडील नागरी वस्तीला धोका पोहोचू नये, यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून माहूर नगरपंचायतची अग्निशमन दलाची गाडी बोलविण्यात आली होती.

साखर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असून माहूर तालुक्यातील विशेषतः वाई बाजार महसूल मंडळात अधिकांश शेतकरी मागील तीन-चार वर्षांपासून उसाचे पीक घेत आहेत.ऊसाला बाण फुटला तरी यवतमाळ जिल्ह्यातील मांगुळ साखर कारखाने वाले ऊस घ्यायला तयार नाहीत. ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना शेत शिवार पिंजून ऊस लागवड करण्याचा तगादा लावतात,मात्र ऊस तोडणी ला आला असताना सुद्धा ते घेऊन जाण्यासाठी चालढकल करतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.