नांदेड। राज्य सरकारच्या क्रिडा धोरणाअंतर्गत येथील गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाच्या विकासासाठी स्टेडियमचे नुतनीकरणाचे काम सुरु झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट खेळपट्टी आणि 78 यार्ड मैदान क्षेत्र असेल. या मैदानात चार मुख्य खेळपट्टीचा विकास करण्यासाठी सन 2018 मध्ये नुतनीकरणासाठी निधी देण्यात आला होता. रेंगाळत पडलेल्या नुतनीकरणाच्या कामास गती देवून हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे क्रिडा राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.


वाशीम जिल्ह्याची बैठक आटोपून विमानाने पुण्याला जाण्यासाठी ना.भरणे हे नांदेडला आले होते. राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानास त्यांनी सदिच्छा भेट दिली. चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बातचीत करताना माहिती दिली. यावेळी चिखलीकर परिवाराच्यावतीने ना.भरणे यांचे शाल, श्रीफळ देवून युवा नेते माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांनी स्वागत केले. यावेळी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनास घाटे, माजी आ.मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगांवकर, दिलीपराव धर्माधिकारी, सुनील नानवटे सर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड स्टेडियम नुतनीकरणाचे काम गेल्या कांही दिवसापासून रेंगळले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतरही काम पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील आमदार व खासदारांसह मुंबई येथे लवकरच बैठक बोलावली जाईल. या बैठकीत नांदेड स्टेडियमच्या कामास गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देवून लवकरात लवकर स्टेडियमच्या कामास गती प्राप्त करुन देण्याचे आश्वासन ना.भरणे यांनी दिले आहे.

आमचे सहकारी जिल्हा राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही कुस्तीपटूंना सरावासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. सरावासाठी मॅट उपलब्ध नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथील कुस्तीपटू प्रणाली शिंदे हिने हरियाणा येथील स्पर्धेत तिचा पहिला क्रमांक हुकला असून तिला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असल्याची माहिती आ.चिखलीकरांनी दिली. त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेतली असून लवकरच नांदेडला कुस्तीच्या सरावासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली जाईल असे ना.भरणे यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकर होणार असल्याची चर्चा आम्ही प्रसार माध्यमातून ऐकत आहे. विलीनकरणाची प्रक्रिया सुरु झाली की नाही हे शरदचंद्रजी पवार व अजितदादा पवार या दोघांनाच माहित. विलीनीकरणासंदर्भात ना.अजितदादा जो निर्णय घेतली तो आम्हा सर्वांना मान्य राहिल अशी सूचक प्रतिक्रिया ना.दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
लक्ष्मण हाके हे अजितदादा पवार यांनाच टार्गेट करीत आहेत. त्यावर आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कांही कांही माणसांना प्रसिध्दीची हाव असते. त्यातीलच हा प्रकार आहे. मोठ्या माणसाविषयी कांही तरी बरगळलं की मिडिया दखल घेते म्हणून हा उठाठेव सुरु असल्याचे आपले मत आहे. फारशी त्या व्यक्तीची दखल घेण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
नांदेड जिल्हा राष्ट्रवादीला जनाधार असलेला नेता आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या रुपाने मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीची घोडदौड सुरु झाली आहे. चिखलीकर साहेबच जिल्हा राष्ट्रवादीची ताकद आहे. आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत चिखलीकर साहेबांचा करिश्मा दिसून येईल, पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचेही ना. भरणे यांनी यावेळी सांगितले.
पुर्न पक्ष प्रवेशाची वेळ राष्ट्रवादीवर आली नाही!
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड सुरु आहे. पक्ष सदस्य नोंदणीचे काम जोमाने सुरु आहे. आमचे नेते ना.अजितदादा पवार हे तीन वेळा नांदेड जिल्ह्यातील पक्ष प्रवेशासाठी आले होते. आता चौथ्यांदा लवकरच येत आहेत. या तीन पक्ष प्रवेशात आम्ही कोणाचाही पुर्न पक्ष प्रवेशाची वेळ राष्ट्रवादीवर आली नसल्याचा टोला अशोकराव चव्हाण यांना लगावून माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांचा पुर्न पक्ष प्रवेश अमित शहा साहेबांच्या कार्यक्रमात झाल्याचा उंगलीनिर्देश आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला हे विशेष!