नांदेड| राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2023-24 या वर्षासाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 10 जून 2025 रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.


डॉ. सोनकांबळे यांनी 33 वर्षांहून अधिक काळ नांदेड जिल्हा परिषदेत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत राहून समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ते भारत वानखेडे प्रणित अजुजाती/जमाती/विजाभज/इ.मा.व./वि.मा.प्र. या शासकीय-निमशासकीय संघटनेचे राज्य महासचिव म्हणून कार्यरत आहेत. या भूमिकेतून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे.

त्यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्हा परिषदेमार्फत शाहू, फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष निधीची तरतूद केली. सामाजिक न्यायाची भावना जपणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील कंधार तालुक्यातील कल्हाळी गावातील 35 हुतात्म्यांच्या स्मारकासाठी शासन निर्णय तयार करून त्यास मंजुरी मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देत जीवदानही मिळवून दिले आहे.

विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. उत्तम सोनकांबळे यांचे कार्य आजही अखंड सुरू आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. या सन्मानाबद्दल डॉ. उत्तम सोनकांबळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.