नांदेड| सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले तपस्वी व्यक्तिमत्व धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांना ६१ सुवासिनींनी ओवाळल्यानंतर उपस्थित्यांनी आणलेल्या पाच क्विंटलपेक्षा जास्त स्वेटर व ब्लॅंकेटची तुला करण्यात आल्यामुळे तुडुंब भरलेल्या कुसुम सभागृहातील एकष्टीचा सोहळा अभूतपूर्व झाला.
या बहारदार सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर खा.अजित गोपछडे,आ.हेमंत पाटील,भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब पांडे, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,प्रवीण साले,अरविंद भारतीया,मुन्नासिंह तेहरा,अशोक धनेगावकर,व्यंकट मोकले,गुरुद्वारा लंगर साहीबचे बाबा सुबेकसिंघ, हभप राऊत महाराज,सौ. सरस्वती आनंदराव बोंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सभागृहा बाहेर गोदावरी जांगिलवाड यांनी काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे मोत्याची माळ आणि नवीन वर्षाचे कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आले.
प्रत्येक पायरीवर दिलीप ठाकूर यांच्या जीवनातील महत्त्वाचे वर्ष फुलाने सजावट केले होते. त्या पायरीवर येताना दिलीपभाऊंच्या परिवारातील एकेक सदस्य सहभागी होत असल्याचे दृश्य अतिशय मनमोहक होते. त्यानंतर दिलीप ठाकूर यांना मिळालेल्या सर्व पुरस्काराचा उल्लेख असलेला भव्य केक कापण्यात आला. सौ जयश्री व दिलीप ठाकूर यांचा भव्य पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. नाथा चितळे, बापू दासरी, प्रमोद देशमुख यांनी याप्रसंगाचे औचित्य साधून बनविलेली चित्रफित पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले.यावेळी प्रास्ताविक करताना प्रवीण साले यांनी दिलीप ठाकूर यांचे प्रचंड कार्य पाहता भाजप पक्षाकडून पाहिजे तितकी दखल घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त केले.
दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे अनेक तरुणांनी अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ. हंबर्डे यांनी दिलीपभाऊंच्या उपक्रमशीलतेचे आपल्या भाषणातून कौतुक केले.अध्यक्षीय समारोप करताना खा. गोपछडे यांनी असे सांगितले की, यापुढे दिलीप ठाकूर यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून दिल्ली दरबारी स्वतःचे वजन खर्ची करणार असल्यामुळे निश्चितच त्यांच्या कार्याची पावती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आ. हेमंत पाटील यांनी दिलीपभाऊंना उर्वरित आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना दिलीपभाऊ भारावून गेले होते. त्यांनी आपल्याला मिळालेल्या सर्व पुरस्काराचे खरे हकदार विविध देणगीदार व आपले सहकारी असल्याचा आवर्जून उल्लेख केला.
नोव्हेंबर २०२६ मध्ये नांदेड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.निमंत्रण पत्रिकेत हार पुष्पगुच्छ न आणता शक्य झाल्यास ब्लॅंकेट,स्वेटर आणावे असे आवाहन केले होते. त्यानुसार जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, प्रमोद हिबारे, हॅप्पी भीसी ग्रुप, अमरनाथ यात्री संघ सिडको,विजय मालपाणी,धनंजय बनभेरू,एसटी विभागीय कार्यालय, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, लायन्स क्लब यांच्यासह अनेकांनी ब्लॅंकेट व स्वेटर ची भेट दिली. त्याचे वजन पाच क्विंटल पेक्षा जास्त झाले.त्यानंतर दिलीप ठाकूर यांची स्वेटर व ब्लॅंकेटने तुला करण्यात आली. अशा प्रकारची अनोखी तुला पहिल्यांदाच केल्यामुळे एक नवीन अध्याय लिहिला गेला.
प्रकाश उंटवाले यांनी सुरेख मानपत्र व राम रत्नपारखी यांनी फ्रिज साठी पन्नास ताटे देऊन दिलीपभाऊंचा सत्कार केला.विशालसिंह ठाकूर यांनी तयार केलेल्या भाऊंच्या वेबसाईडचे मान्यवारांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या सोहळ्यासाठी माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे, शहर संघ चालक डॉ.गोपाल राठी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, व्यावसायिक, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी,भाऊंच्या उपक्रमाचे देणगीदार, मित्रपरिवार व ठाकूर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलीपभाऊ वरचे प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन दिनेशसिंह व रोहितसिंह ठाकूर या पिता पुत्रांनी केले.सुरेश लोट यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन नेहा व सतेजसिंह राजपूत,पूजा व अमोलसिंह चौहान,राजेशसिंह ठाकूर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगतसिंग ठाकूर, अवतारसिंग पहरेदार,अरुण काबरा,कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, शिवा लोट, दीपकसिंह ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले. ठाकूर परिवारातर्फे ठेवण्यात आलेल्या चविष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. समाजसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या दिलीप ठाकूर यांचा एकसिष्टीचा कार्यक्रम अविस्मरणीय झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.