नांदेड| गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत ऑरेंज सीटी नागपुर, बीएसएफ जालंधर, एसजीपीसी अमृतसर, इंडियन आर्मी जालंधर आणी कस्टम मुंबई संघांनी मजल मारली असून उद्या आठ संघ उपांत्य पूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. आज सकाळी ऑरेंज सीटी नागपुर आणी पीएसपीसीएल पटिआला संघादरम्यान पहिला सामना खेळला गेला. नागपुर संघाने खेळाला जोरदार सुरुवात करतांना 25 मिनिटात तीन गोल केले.
नियाज अहमद, साकिब रहीम आणी मोईस अब्दुल यांनी प्रत्येकी गोल करत मोठी आघाडी मिळवून दिली. पण खेळात परतण्याचा प्रयत्न करीत पटिआला संघाच्या मनबीरसिंघ ने 29 मिनिटास मैदानी गोल केला. तसेच 37 व्या मिनिटाला कुलविंदरसिंघ ने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल करत आघाडी कमी केली. परन्तु 40 व्या मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा रूपांतरण गोल मध्ये करत नागपुरच्या नियाज रहीमने पुन्हा गोल संख्यचे अंतर वाढवले. पटिआला संघाने गोल करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आणी 50 व्या मिनिटाला गुरतेजसिंघ याने मैदानी गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रयत्न करून देखील गोल होऊ शकले नाही. शेवटी ऑरेंज सीटी नागपुरने 4 विरुद्ध 3 गोल अंतराने सामना जिंकला.
आजचा दूसरा सामना ए. जी. हैदराबाद आणी बीएसएफ जालंधर संघात खेळला गेला. अटीतटीच्या या सामन्यात जालंधर संघाने 2 विरुद्ध 1 गोल अंतराने विजय संपादित केला. दोन्ही संघानी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बीएसएफच्या हरसूखप्रीत सिंघने 39 व्या मिनिटाला आणी नवीन टीरकीने 51 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मध्ये गोल साधला. हैदराबाद संघाच्या रामाकृष्णाने 55 व्या मिनिटाला मैदानी गोल केला.आजचा तीसरा सामना खालसा यूथ क्लब नांदेड आणी एसजीपीसी अमृतसर संघात खेळला गेला. अती संघर्षपूर्ण या सामन्यात अमृतसर संघाने शेवटच्या पाच मिनिटात सामना फिरावला. दोन्ही संघांनी एकमेका विरोधात गोल करण्यासाठी अनेक हल्ले चढवले. खेळाच्या 55 मिनिटाला अमृतसरच्या सुखदेव सिंघ याने मैदानी गोल केला. त्याच्या पाठोपाठ गुरप्रीतसिंघने 59 मिनिटाला गोल करत सामन्यात पकड घट केली. नांदेडच्या संघास गोल साधण्यात अपयश आले.
आजच्या चौथ्या सामन्यात आर्मी इलेवन जालंधर संघाने रेल्वे बिलासपूर संघाचा 3 विरुद्ध 1 गोलाने पराभव केला. बिलासपुर संघाच्या कर्णधार दलबीरसिंघ याने खेळाच्या 8 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल करून आघाडी मिळवली होती. आर्मी इलेवन संघाने खेळाच्या 20 व्या मिनिटाला समीर मिंज याने केलेल्या मैदानी गोल वरून बरोबरी साधली. नंतर 30 व्या मिनिटाला मनिंदरसिंघने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल केला आणी आघाडी घेतली. पुन्हा 54 व्या मिनिटाला मनिंदरसिंघनेच पेनल्टी कॉर्नरचा रूपांतर गोल मध्ये करत निर्णायक परिस्थितित सामना नेला.
आजचा पाचवा आणी शेवटचा सामना कस्टम मुंबई आणी एनडीएसएफ इस्लामपुर संघात खेळला गेला. बलाढ्य कस्टम मुंबई संघाने हा सामना 2 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. खेळाच्या 10 व्या मिनिटाला मुंबईच्या कर्णधार जयेश जाधव याने सुरेख मैदानी गोल केला. त्यानंतर वेंकटेश देवकर याने खेळाच्या 29 व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकाविरुद्ध गोल करण्याचे अनेक प्रयत्न केलेत पण गोल होऊ शकले नाही. मुंबईचा सहज विजय झाला. आजच्या विविध सामन्यात राजकुमार झा, गुरप्रीतसिंघ, रतिन्दरसिंघ बरार, सिद्धार्थ गौर, कारणदीपसिंघ, अश्विनीकुमार यांनी पंच म्हणून कामगिरी पहिली. तर गुरमीतसिंघ, राहूल राज, गुरतेजसिंघ घाटाउरा, प्रिंससिंघ, विजयप्रकाश मंगलूरकर यानी तांत्रिक पंच म्हणून कामगिरी पार पाडली. शुक्रवारी साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस असणार असून शनिवारी क्वाटर फायनलचे सामने खेळले जाणार असल्याची माहिती हॉकी आयोजन समिती प्रमुख स. गुरमीत सिंघ नवाब यांनी दिली आहे.