नांदेड| प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रा. सुग्राम पुल्ले व्याख्यानमाला’ तसेच राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या व्याख्यानमालेचे तिसरे वर्ष आहे.

या व्याख्यानमालेअंतर्गत यापूर्वी डॉ. राजशेखर सोलापुरे व डॉ. रामकृष्ण बदने यांनी आपले विचारमंथन मांडले होते. यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर (अहिल्यानगर) यांचे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर बहुमोल व्याख्यान होणार आहे.

प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकास ‘प्रा. सुग्राम पुल्ले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला जातो. गतवर्षी ‘उसवण’ या कादंबरीचे लेखक देवीदास सौदागर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.


यंदाच्या वर्षी मराठी साहित्यविश्वातील मानाच्या या पुरस्कारासाठी प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ‘लंबाडी’, ‘कोंडणातलं जिणं’, ‘हुतराणी’ या कादंबऱ्या तसेच ‘रानभूल’, ‘मॅपको’ हे कथासंग्रह आणि ‘खोल डोहातल्या सावल्या’, ‘सावली हरवलेले झाड’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. डॉ. पाटील यांना रोख रक्कम रुपये ५००१, मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


हा सोहळा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सायन्स कॉलेज नांदेड येथील स्व. पुरणमलजी लाहोटी सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. के. राजकुमार भूषविणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. मनीषा जितेंद्र पुल्ले, सचिव डॉ. जितेंद्र सुग्राम पुल्ले तसेच संयोजन समितीचे प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, विजयकुमार बेंबडे, अनंत रेड्डी भुरकापल्ले, प्रा. डॉ. शिवसांब कापसे, लिंगराम हंडरगुळे, सुनील मुसने आदींनी केले आहे.

