नांदेड l दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला केंद्र सरकारचा ‘अ’दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना नांदेडचे खा.रवींद्र चव्हाण आणि लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिल्या. विशेष म्हणजे माळेगाव येथे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठीही प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या दोन्ही खासदारांनी दिले.
माळेगाव येथील खंडोबा यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा आणि नियोजन या संदर्भात खा.डॉ.शिवाजीराव काळगे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने बुधवारी दुपारी माळेगाव येथे विशेष बैठक घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दोन्ही खासदारांना यात्रेच्या नियोजनाचा आढावा सादर केला.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र माळेगाव यात्रेला केंद्राचा‘अ’ दर्जा होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा, तो मंजूर होण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करू,अशी ग्वाही दोन्ही खासदारांनी दिली.
याशिवाय माळेगाव यात्रेच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. यात्रेकरूंना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ माळेगाव येथे भव्य स्मारक उभारावे हा माळेगाव ग्रामपंचायतीचा प्रस्ताव सर्वमान्य आहे. त्यांचे स्मारक उभारण्यासाठीही यथायोग्य प्राधान्याने प्रयत्न करू, असेही आश्वासन खासदारद्वयांनी दिले.
यात्रेतील कला व लावणी महोत्सवातील कलावंतांचा राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे योग्य सन्मान व्हावा, सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राज्यपातळीवर दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांच्या मालिकेत या कलावंताचाही समावेश व्हावा यासाठीही महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा.रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सुमारे तीन तास चाललेल्या आढावा बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली.
असुविधांकडे खा.चव्हाण यांनी वेधले लक्ष
आढावा सादर करतांना अनेक सूविधांचा अभाव असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतांना खा . रविंद्र चव्हाण यांनी, यात्रे करूंसाठी,टेलीफोन बूथ ऊभारण्याची , स्व च्छ,पाणी पूरवठा,आरोग्य सूविधा,महिला सूरक्षा या बाबीना प्राधान्य देण्याबाबत,तसेच विद्युत व्यवस्थापन चोख ठेवण्याबाबत सूचना केली.