हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातुन तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या सवना आणि हादगावकडं जाणाऱ्या जवळगाव येथील रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याची अत्यन्त दयनीय अवस्था झाली आहे. या अंडरग्राउंड रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून, येथून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता विभागीय रेल्वे व्यवस्थापक व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देऊन सवना आणि जवळगाव अंडर ब्रिज रस्त्याकडे लक्ष देऊन दर्जेदार सिमेंट काँक्रेट रस्ता करून देत संभावना अपघात टाळावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज खालील सिमेंट रस्त्याचे काम मागील काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना माती मिश्रित रेती व हलक्या प्रतीचे सिमेंटचा वापर करून थातुर माथूर पद्धतीने रस्ता केला. सदरचे काम होताना अनेकांनी रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याच्या बोगस कामाबाबत आवाज उठविला. मात्र तत्कालीन राजकीय नेत्यांचं अभय आणि संबंधीत अभियंत्याचे याकडे झालेले स्वार्थापोटी दुर्लक्ष यामुळे पावसाळ्यात रस्त्याची पूर्णतः वाट लागली.
आज घडीला या सिमेंट काँक्रेट रस्त्यावर गुडघाएवढे खड्डे झाले असून, येथून वाहन चालविणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांची मोठी परवड होते आहे. एकाबाजूचा रस्ता खड्डेमय झाल्याने दुसऱ्या बाजूने वाहनांना ये – जा करावी लागत आहे. कधी कधी तर एकाच वेळी दोन्हीकडील वाहने आली तर वाहनांना पुढे मार्गक्रमण करताना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
परिणामी अंडरग्राउंड सिमेंट रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थेला वाहनधारक वैतागले असून, नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जवळगाव आणि सवना रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन वाहनधारकांची होणारी अडचण दूर करावी. तसेच नव्याने रस्त्याचे सीमेंटीकरण करताना अंदाजपत्रक प्रमाणे दर्जेदार सिमेंट काँक्रेटचा रस्त्याचे काम झाले पाहिजे याची खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहनधारक प्रवाशी वर्गातून केली जात आहे.