हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, प्रशासक व संबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरातील सर्वच प्रभागातील नाल्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. दुर्गंधीमुळे डासांची उत्पत्ती वाढवून साथीचे आजार जडण्याचे भीती नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकदाराकडून महिनो महिने नाल्याची स्वच्छता केली जात नसल्यामुळे हा प्रकार उद्भवत असल्याचा आरोप नागरिकातून केला जात आहे.
हिमायतनगर शहरांमध्ये एकूण 17 प्रभाग असून, तीस हजाराच्या आसपास शहराची लोकसंख्या गेलेली आहे. तसेच झालेली वस्तीवाढ यामुळे नगरपंचायतीकडे स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले यंत्रणा नसल्यामुळे शहराच्या स्वच्छतेचे दार महिन्याला सोशल मीडियावर धिंडवडे निघत आहेत. नगरपंचायतीवर प्रशासक राज असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून शहरातील नागरिकांना स्वच्छतेसह विविध नागरी समस्यांचा समान करावा लागत आहे. नगरपंचायतीने मागील काळात स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जात होते तोच कित्ता आजही सूर आहे, मात्र स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रणा व कर्मचारी नसल्यामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हिमायतनगर शहरच स्वच्छ शहर सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपंचायतीने लाखो रुपये खर्च केले मात्र शहराची अवस्था जैसेथेच असून, यामुळे शहरातील नागरिकांना अस्वच्छतेच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच शहरातील वार्ड क्रमांक पाच मध्ये एका नागरिकाने महिन्यापासून नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाकडून कचरा उचलण्यात होत असलेली टाळाटाळ पाहून थेट कचरा मुख्य रस्त्यावर टाकून नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाचा तीव्र शब्दात निषेध केला. एव्हढेच नाहीतर यानंतरही असा प्रकार झाल्यास थेट नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये नाल्यातील हि घाण आणून टाकण्याचा इशाराही दिला होता. त्यावेळी नगरपंचायतीने तात्काळ त्याठिकाणी जाऊन स्वच्छता केली. मात्र अजूनही बहुतांश प्रभागांमध्ये अशाच प्रकारची दुर्गंधी व कचऱ्याचे ढीगारे दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी दिनांक ०९ रोजी वार्ड क्रमांक एक मधील जागरूक युवक नितीन मुधोळकर यांनी सोशल मीडियावर तुडुंब उभरलेल्या नाल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाबद्दल आवाज उठवित स्वच्छ शहर सुंदर शहराची अवस्था उघड केली आहे. दर महिन्याला स्वच्छतेचा हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या प्रभागात उद्भवत असताना नगरपंचायतीसमोर जाऊन बोलण्याची हिंमत त्या भागातील प्रत्येक नागरिकांनी दाखविली तर कुंभकर्णी झोपेत असलेला नगरपंचायतीचा स्वच्छता विभाग पूर्ववत कामाला लागेल नाहीतर शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न कधीच निकाली निघणार नाही हे शहराच्या सध्या परिस्थीवरून दिसून येत आहे.
एकूणच स्वच्छतेसह इतर नागरिक सुविधा देण्याला नगरपंचायत प्रशासनाचे प्रशासक अधिकारी, स्वच्छता विभागाच्या संबंधित अधिकारी, सुपरवायझर, स्वच्छता कर्मचारी तेवढेच जबाबदार आहेत असेही विविध समस्यांचा सामना करणाऱ्या अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता ठेकेदाराचे देयके मागील अनेक महिन्यापासून मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे सांगितले जात आहे. याकडे नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यासंदर्भात एक बैठक घेऊन शहरवासीयांच्या समस्यांबाबत उपाययोजना करून तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी रास्त अपेक्षा नागरिक बोलून दाखवत आहेत.
नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हिमायतनगर येथील नगरपंचायतने नेमलेल्या ठेकेदाराने चक्क कचरा उचलणे बंद केले होते. याबाबतच्या तक्रारी अनेकांनी थेट नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर याना दूरध्वनीवरून करताच त्यांनी नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक महाजन याना सूचना देऊन स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. शहरवासीयांना आरोग्याची समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. त्यावेळी नगरपंचायतीने तात्काळ शहरातील कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात केली, मात्र पुन्हा जैसे थेच हाल होऊ लागल्याने हिमायतनगर शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष देऊन नगरपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा आणि शहरातील नागरिकांच्या प्रमुख नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी सुजाण नागरिक करत आहेत.