हिमायतनगर। येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जराड यांची नुकतीच जालना येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी नांदेड येथुन अमोल भगत यांची नियुक्ती करण्यात आली असून, तेपोलीस निरीक्षक पदावर रुजु झाले आहेत. पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अवैध धंदे करणाऱ्याचा आढावा घेऊन कार्यवाहिचा बडगा उगारत एका जुगार अड्डय़ावर छापा टाकून जवळपास १५ जुगार्याना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची झोप उडाली आहे.


अमोल भगत हे नवतरुण असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृतीवर त्यांचा वचक बसण्याची शक्यता तुर्त तरी दिसत येत आहे. नांदेडला येण्यापूर्वी पोलिस निरीक्षक अमोल भगत हे मुंबई येथे कार्यरत होते. मुबईचा त्यांचा अनुभव पाहता ते आपल्या कार्यकाळात हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध कारभारावर आपल्या कर्तृत्वाने जरब बसविण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे की, पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावर चालत असलेल्या एका जुगार अड्डय़ावर पोलीसांनी छापा टाकून जवळपास १५ जुगार्याना ताब्यात घेतले. हि कारवाई दि.९ मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली असून, हिमायतनगर पोलीस ठाण्यात वृत लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


शहरात अवैध धंद्यानी थैमान घातले असून, अवैध धंदे तर बिनदिक्कत पणे चालूच आहेत. परंतू शहरात गँगवॉर सारखे प्रकरणे घडू लागली. परवाच अश्या प्रकारची घटना घडली असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतू शहरातील सुज्ञ नागरिकांनी तसे होवू न देता घडलेले प्रकरण सामंजस्याने हाताळले. परंतू घटना घडल्यानंतर जनतेचा पोलीसावर रोष होताच, जिल्हापोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घडलेल्या घटनेची गंभीर नोंद घेवून प्रकरण चांगल्याप्रकारे हाताळले. दरम्यान जऱ्हाड यांची जालना येथे बदली झाली.


अवैध धंदे बंद करण्यात यश मिळेल का..?
हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत बोटावर मोजता येतील एवढेच गावे वगळता गावोगावी, वाडी, तांड्यावर अवैध देशी दारू विकणाऱ्या लोकांनी कहर केला आहे. मागील काळात गावातील दारु बंद करावी म्हणून काही गावच्या महिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले होते. दुर्दैवाने मागील काळात अनधिकृत दारु बंद करण्यास प्रशासनाला म्हणावे तेव्हडे यश आले नाही. त्यामुळे नव्याने रुजु झालेले पोलिस निरीक्षक अमोल भगत यांना तालुक्यातील अनाधिकृत देशी दारू सह शहर व ग्रामीण भागातील मटका, गुटखा, जुगार अड्डे बंद करण्यास यश येईल का..? याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.



