नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म अँड टेलिव्हीजन इंन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जानेवारी ते २८ मार्च या कालावधी दरम्यान तीन महिन्यांच्या फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन ॲक्टिंग अभ्यासक्रमाचे दुस-यांदा आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमाची दि. ६ जानेवारी पासून करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवशी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॅा. पृथ्वीराज तौर व भाषा संकुलाचे संचालक डॅा. दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अभ्यासक्रमाचे सहाय्यक संचालक तथा एफटीआयआय चे तज्ञ सुशांत शर्मा व फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन ॲक्टिंग अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील अभ्यासक्रमात महाराष्ट्रासह राजस्थान, झारखंड, गुजरात, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले असून, ते पुढील तीन महिने विद्यापीठात वास्तव्य करुन चित्रपट अभिनयाचे धडे गिरवणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमाच्या निमीत्ताने परराज्यातील विद्यार्थी ‘स्वारातीम’ विद्यापीठ व ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने यापुर्वी दि. २२ जुलै ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सदरील तीन महिन्यांचा फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन ॲक्टिंग अभ्यासक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. ज्यात देशभरातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात पूर्णवेळ राहून हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व या अभ्यासक्रमाचा लाभ या देशभरातील कलावंत विद्यार्थ्यांनी घेतला. शिवाय विद्यापीठ व फिल्म ॲन्ड टेलिव्हीजन इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार मागील शैक्षणिक वर्षात ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने स्मार्ट फोन फिल्म मेकिंग, स्क्रिन ॲक्टिंग, फिल्म ॲप्रिसीएशन व स्किन प्ले रायटींग आदी विविध विषयावर जवळपास सहा लघु अभ्यासक्रमांचे आयोजन केले होते.
चित्रपट निर्मीतीच्या प्रशिक्षणासाठी अता पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहराकडे न जाता ही संधी विद्यापीठाने नांदेडमध्येच उपलब्ध करुन दिली असल्याने आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राज्यांच्या सीमा ओलांडून परराज्यातील विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.