नांदेड| नांदेड शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने भव्य मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मीनल करनवाला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या संकल्पनेतून या मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नियोजनचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती.

हे प्रदर्शन नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूल, वजिराबाद येथे 6 जानेवारीपासून सुरू झाले असून, यत्या 10 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी व हिंगोली अशा विविध जिल्ह्यांतील स्वयं सहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, मसाले, सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या उत्पादनाचे दालन येथे उभेल केले आहे. महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. मकर संक्रांतीनिमित्त या प्रदर्शनाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नांदेडकरांना या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती हे मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.
