कंधार/नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कंधार तालुक्याचा आज दौरा केला. यावेळी त्यांनी उस्मानपुरा येथील घरकुल कॅम्पला भेट दिली. गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सुरू असलेल्या योजनांची प्रगती तपासली. गेल्या एक वर्षापासून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम बंद असल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित एजन्सीला काम तात्काळ सुरू करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
त्यानंतर त्यांनी कंधार पंचायत समितीला भेट देऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. कोट बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. कोट बाजार येथील जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश दिले. अंबुलगा व तेलंगवाडी ग्रामपंचायतीलाही त्यांनी भेट दिली. 15 वित्त आयोग अखर्चित निधी बाबत आढावा घेतला. घरकुल नोंदणी बाबत पहाणी केली.
तेलंगवाडी येथील बंद पडलेले जल जीवन मिशनचे काम पूर्ववत सुरू करण्यासाठी सरपंच व ठेकेदार यांना यांना सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, उप अभियंता बनसोडे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.