नांदेड| संपूर्ण भारतात आज रोजी निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेस सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
व्यासपीठावर सरपंच सौ मंदाकिनी यन्नावार उपसरपंच दत्ता कदम पोलीस पाटील वसंत पल्लेवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मोहिमेची सुरुवात ७ डिसेंबर २०२४ पासून झालेली असून २४ मार्च २०२५ रोजी याची सांगता होईल. सदर मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षय रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे ,क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे ,वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे समाजातील क्षयरोगा विषयी असलेल्या गैरसमजुती दूर करणे आदि असून शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
उद्घाटना प्रसंगी क्षय रुग्णांच्या संपर्कातील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी आशा व एएनएम यांनीही सी वाय टेस्टची तपासणी करून घेऊन प्रत्यक्ष रूपाने कार्यक्रमास सुरुवात केली. या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ .गणपत मिरदुडे ,डॉ.अमृत चव्हाण डॉ ज्ञानोबा जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण मुंडे वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड ,डॉ मुदीराज , डॉ गुडपे ,डॉ खाजा मोईनुद्दीन आणि आरोग्य कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड यांनी केले आहे .